विशेषज्ञांच्या अंदाजानुसार आगामी काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच राहील. अशा स्थितीत ज्यांच्या घरात लग्नसराईचा कार्यक्रम आहे किंवा सोने खरेदीचे शौकीन असलेले किंमत ६० हजारांच्या आसपास राहिली तरी ते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला पसंत करतील.
अक्षय्य तृतीयेला सोन्याची खरेदी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दागिने आणि नाणी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक त्यांच्या क्षमतेनुसार छोटे-मोठे दागिने किंवा नाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, गेल्या चार महिन्यांत सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र खरेदीसाठी खिसा रिकामा करावा लागू शकतो. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलचे (GJC) अध्यक्ष सन्यम मेहरा यांनी सांगितले की, अलीकडेच सोन्याचे दर ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचल्याने ग्राहकांचा मोठा वर्ग घाबरला आहे. दरम्यान, शुद्ध सोन्याचा सध्याचा भाव सुमारे ६० हजार २८० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
सोन्याची विक्री घसरण्याची शक्यता
सध्या शुद्ध सोन्याचा भाव ६० हजार पार व्यवहार करत आहे. अशा स्थितीत मेहरा म्हणाले की अक्षय्य तृतीयेच्या एकूण व्यवसायात दक्षिण भारतीय राज्यांचा वाटा सुमारे ४०% असेल तर पश्चिम भारताचा वाटा २५ टक्के राहील. या खरेदीत पूर्व भारताचा वाटा २० टक्के आणि उत्तर भारताचा वाटा सुमारे १५ टक्के असेल.
सोन्या-चांदीतील गुंतवणूक
सोन्या-चांदीच्या भावात यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच १०% वाढ नोंदवली गेली असून दरवाढीचे सत्र सुरूच राहणे अपेक्षित आहे. यंदाच्या वर्षी जागतिक मंदी, भू-राजकीय अनिश्चितता तसेच व्याजदरातील संथ वाढ यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. मागणी आणि पुरवठा घटकांचा ऐतिहासिकदृष्ट्या विशेषतः बाजारातील अनिश्चिततेच्या परिस्थितीत देखील सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम झालेला नाही. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली, त्यामुळे आता त्यात काहीशी नरमाई येण्याची शक्यता आहे.