मुंबईःरणरणत उन, बस आणि रिक्षासाठी रांगा व गर्दी यामुळं मुंबईकरांचा जीव मेटाकुटीला येतो. मात्र आता प्रवाशांना गारेगार प्रवास मिळणार आहे. मुंबई महा मेट्रोने मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत आणखी मेट्रोच्या आणखी आठ फेऱ्या दाखल होणार आहेत.मेट्रो 7 आणि 2A (गुंदवली-दहिसर-अंधेरी पश्चिम) या मार्गावर आणखी आठ फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. सोमवारपासून मुंबईकरांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या आठ फेऱ्या वाढवल्यामुळं आता मेट्रो ७ आणि २ए या मार्गावर एकूण २५३ फेऱ्या होणार आहेत. यापूर्वी २४५ फेऱ्या या मार्गावरुन धावत होत्या.
मेट्रो 7 आणि 2A (गुंदवली-दहिसर-अंधेरी पश्चिम) या मार्गावरील प्रवासी संख्या वाढली आहे. प्रवाशांचा वाढता भार लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. गर्दीच्या वेळात मेट्रो फेऱ्यांची वांरवारता ८ मिनिटांऐवजी ७. २९ मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच दर ७.२९ मिनिटांला मेट्रो धावणार आहे, असं एमएमओसीएलचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी म्हटलं आहे.
मेट्रो २ ए आणि ७ या दोन्ही लाइनवर दोन स्टेशन आहेत. या दोन्ही लाइन्समुळं लिंक रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी सुरळीत होण्यास मदत होणार आहे. लाइन ७ मार्ग हा अंधेरी ते दहिसरपर्यंत आहे. तर २ए दहिसर पश्चिम ते डीएन नगरपर्यंत आहे.