जळगाव :अनेक दिवस उलटूनही पत्नीसोबत तडजोड होत असल्याने तसेच पत्नी तडजोड करण्यास तयार होत नसल्याने पती तरुणाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयासमोरच फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. अनंता अशोक उमाळे (वर्षे ३०, राहणार-वरणगाव) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वरणगाव येथील अनंता उमाळे हा तरुण मुंबईतील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचा भुसावळातील एका तरुणीसोबत विवाह झाला. मात्र, कौटुंबिक वादातून सहा महिन्यांपासून पत्नी माहेरी राहत आहे. काही महिन्यांपूर्वी पत्नीने अनंता उमाळे यांच्याविरूध्द पोलिस अधीक्षक कार्यालय आवारातील महिला दक्षता समितीकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीवर सुनावणीसाठी गुरुवारी अनंता उमाळे व त्यांची पत्नी हे दोघेही महिला दक्षता समितीच्या कार्यालयात आले होते. समितीकडून दोघांमध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपयोग झाला नाही.
या तक्रारीवर सुनावणीसाठी गुरुवारी अनंता उमाळे व त्यांची पत्नी हे दोघेही महिला दक्षता समितीच्या कार्यालयात आले होते. समितीकडून दोघांमध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपयोग झाला नाही.
झेरॉक्स काढून आणतो म्हणून बाहेर पडला अन् बाटली काढत केले फिनाइल प्राशन
या पती-पत्नीमध्ये तडजोड होत नसल्याने गुरुवारी लेखी लिहून महिला दक्षता समितीने दोघांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर उमाळे हा मी कागदपत्रांची झेरॉक्स काढून आणतो असे वडिलांना सांगून कार्यालयाबाहेर बाहेर पडला आणि त्याने बॉटलमध्ये सोबत आणलेले फिनाइल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
फिनाइल प्यायल्यानंतर अनंता हा खाली कोसळला. यावेळी याठिकाणी असलेल्या त्याच्या कुटूुंबीयांसह पोलिस कर्मचारी व नागरिकांनी त्याला उचलून रिक्षातून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. अनंता पत्नीला नांदविण्यास तयार होता, पण तिने नकार दिल्यानंतर त्याने कार्यालयाबाहेर येऊन फिनाइल प्यायल्याचे याच्या कुटुंबीयांनी बोलतांना सांगितले.