AC Local Train Mumbai : मुंबईसह महाराष्ट्रात तापमान वाढलं आहे. मुंबईतील उकाडा वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. अशा उकाड्यात एसी लोकलचा मुंबईकरांना आधार असतो. पण ऐन उकाड्यात एसी लोकलच्या ११ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप झाला.

विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या धीम्या एसी लोकलमध्ये वातानुकूलित यंत्रणांमधून कमी थंडावा येत असल्याच्या तक्रारींमुळे प्रवाशांनी सकाळी ९.०२ वाजता मिरारोड स्थानकात आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबवली. तांत्रिक अडचणींमुळे एका डब्यातील दोन दरवाजे बंद आणि दोन खुले ठेवून गाडी महालक्ष्मी स्थानकात आणून दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीनंतर एसी यंत्रणा सुरू झाली आणि दरवाजे बंद करून गाडी चर्चगेटकडे रवाना करण्यात आली, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारशेडमध्ये तपासणी करताना अन्य लोकलमध्येही तांत्रिक बिघाड असल्याची बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. ही गाडी जलद मार्गावर धावणार होती. बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्याने ही गाडी प्रवासी सेवेत न चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सात एसी जलद लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या दोन्ही लोकलमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू होते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.