मुंबई: राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा हा विजय आहे. त्यामुळे एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी रडणे बंद करावे, असा सल्ला शिवसेनेने ओवेसी यांना दिला आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली होती. त्यावरून शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. असदुद्दीन ओवेसी म्हणतात, अयोध्येत ‘पंतप्रधान भावनिक झाले. मिस्टर पंतप्रधान, मीसुद्धा तितकाच भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्वास ठेवतो. मी भावनिक झालो, कारण त्या ठिकाणी ४५० वर्षे एक मशीद उभी होती.’ ओवेसी काय म्हणतात ते ढोंगच आहे. कारण पाच हजार वर्षांपासून तेथे एक राममंदिर होते. ते तोफा लावून पाडले गेले व तेथे मशीद उभी केली गेली! त्यामुळे नक्की कोणी भावनिक व्हायचे? जे पाप तोफांनी उभे केले ते पाप शिवसैनिकांनी हातोड्यांनी उद्ध्वस्त केले. लोकभावनेचा हा विजयच आहे! मिस्टर ओवेसी, आता रडणे वगैरे बंद करा, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

शिवसेनेची टीका

>> सर्वोच्च न्यायालयाचा राममंदिराबाबतचा निर्णय देशातील मुसलमानांनी स्वीकारला आहे. ओवेसी म्हणतात, ‘बाबर जिवंत आहे.’ आम्ही विचारतो, ‘कोण हा बाबर? हा बाबर तुमचा कोण लागतो?’ आता तर बाबरीचे नामोनिशाणही मिटले व भूमिपूजन सोहळ्यामुळे अयोध्येतील सुतकही गेले. बाबर आता भारतातच काय, तर जगात कोठेच जिवंत नाही. ज्या उझबेकिस्तान नामक प्रांतातून तो आला त्या देशात तरी तो किती जिवंत आहे याचे भान ओवेसींसारख्या उच्चशिक्षित मुसलमान पुढाऱ्यांनी ठेवले पाहिजे.

>> मोगलांच्या आक्रमणात हिंदूंचे स्वामित्व काही काळ लयास गेले, पण म्हणून त्यांचे अस्तित्वच संपले असे होत नाही. बाबराने रामजन्मभूमीचा विध्वंस केला व तेथे मशीद उभारली हे ओवेसींसारखे नेते का स्वीकारीत नाहीत?

>> ओवेसी म्हणतात, ‘भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे राममंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहून मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. आजचा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून हिंदुत्वाचा विजय आहे!’ ओवेसी यांच्या बोलण्यात तथ्य नाही. ते वातावरणात गरमी आणू पाहत आहेत, पण आता ते शक्य नाही. मुळात स्वतः ओवेसी तरी खरे निधर्मी आहेत काय याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. अयोध्येतील भूमिपूजन हा हिंदुत्वाचा विजय असल्याचे शल्य ओवेसी यांनी बोलून दाखवले. आम्ही सांगतो, हा न्याय व सत्य यांचा विजय आहे. कायदेशीर मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून तो मिळवला आहे.

>> ओवेसी म्हणतात, मोदी यांनी अयोध्येत केलेले मंदिराचे भूमिपूजन असंवैधानिक आहे. ओवेसी, कोणत्या संविधानाच्या गोष्टी आपण करीत आहात? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराबाबत निर्णय दिला. म्हणजे संविधानाचा आदर ठेवूनच अयोध्येत पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आहे. हिंदुत्व हे सगळ्यात जास्त निधर्मी आहे. कारण ते देशाचे संविधान व न्यायालयाचा आदर करते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here