सचिन यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला व आपल्या वाटचालीत सातत्याने साथ देणाऱ्या माध्यमांचे आभार मानले. ‘कौतुकाची थाप कामगिरी अधिक उंचावते यावर माझा विश्वास आहे. माध्यमांनी माझे कौतुक केले, त्यामुळेच मला कठोर परिश्रम करण्यासाठी बळ मिळाले. मी काही कायमच यशस्वी ठरलो नाही. मला अपयशालाही सामोरे जावे लागले. मात्र क्रिकेट या सुंदर खेळाने मला माझ्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. अपयशानंतर वाटचाल करीत राहणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक असणारे इंधन तुम्ही मला दिलेत. तुमच्या मदतीविना मी हा टप्पा पार केला नसता,’ सचिन नेहमीच्याच सद्भावनेने सांगत होते.
‘माझी कारकीर्द सुरू झाली, त्यावेळी खेळाडू आणि माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये नियमित संवाद होत असे. आम्ही एकाच खोलीत भोजन घेत असू. त्यामुळे आमचे संबंध व्यावसायिक राहिले नाहीत. माध्यमांनाही मैदानाबाहेर खेळाडू कसा आहे ते समजत असे. त्यामुळे खेळाडूंच्या कारकिर्दीतील चढउतार त्यांना समजतात,’ याकडेही सचिन यांनी लक्ष वेधले.
पहिल्या मुलाखतीची आठवण
‘माझी पहिली मुलाखत शिवाजी पार्क येथील हॉटेलमध्ये घेण्यात आली होती. मुलाखत कशी घेतली जाते, काय विचारणार हेही माहिती नव्हते. त्यामुळे मला थोडे दडपणही आले होते; पण बनमस्का खात मी ती मुलाखत दिली,’ असे त्यांनी सांगितले.
मी काही कायमच यशस्वी ठरलो नाही. मला अपयशालाही सामोरे जावे लागले. मात्र, क्रिकेट या सुंदर खेळाने मला माझ्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली.
– सचिन तेंडुलकर
अर्जुनला साथ देत आहात…
‘मी निवृत्त झालो, त्या वेळी अर्जुनला साथ देण्याची विनंती केली होती. ती विनंती क्रिकेटपटू म्हणून नव्हे, तर अर्जुनचा वडील म्हणून होती. त्याला आता जवळपास दहा वर्षे झाली. तो आता २३ वर्षांचा परिपक्व क्रिकेटपटू झाला आहे. त्याला फक्त क्रिकेटच खेळायचे आहे,’ असेही सचिन यांनी अभिमानाने सांगितले.
छायाचित्र न छापल्याची खंत
‘शालेय क्रिकेटमध्ये मी शतक केले, त्याची बातमी चांगली आली; पण माझे छायाचित्र आले नाही. ते पाहून मित्रांनी माझी खिल्ली उडवली. ‘सबका फोटो आता है, तेरा नही आया’ असे मित्रांनी चिडवल्याने मी नाराज होतो. ‘पुढच्या वेळी नक्की फोटो येईल,’ असे सांगून आई-वडिलांनी माझी समजूत काढली. तरी माझा राग कमी न झाल्याने वडील त्यांच्या एका मित्राबरोबर बोलले. त्यानंतर दोन दिवसांत भला मोठा लेख छापून आला. ते पाहून माझ्या कुटुंबीयांची कुचंबणा झाली. ते दोन दिवस घराबाहेरच पडले नाहीत,’ अशी आठवण सचिन यांनी सांगितली.
मुंबई इंडियन्सची टीम एअरपोर्टवर स्पॉट, जोफ्रा आर्चरने खाल्ला भाव