कोल्हापूर :शाळेला सुट्टी लागल्याने मामाच्या गावाला जात असताना एका तरुणीला ट्रकने धडक दिल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना काल शुक्रवारी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळीजवळील सेल टॅक्स नाक्यावर घडली. श्रेया हेमंतकुमार हळीज्वाळे (राहणार कसबा सांगाव, तालुका कागल) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे राहणारी श्रेया ही डी. एम. हायस्कूलची विद्यार्थिनी होती. अभ्यासात अत्यंत हुशार आणि मनमिळावू स्वभाव, अशी तिची ओळख होती. यामुळे ती शाळेत शिक्षकांची लाडकी होती. श्रेयाने नुकतीच आठवीची परीक्षा दिली होती. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने श्रेया आपला मामा शशीधरसोबत सुट्टीसाठी दुचाकीवरुन बेळगावकडे निघाली होती. मात्र याच वेळी काळाने घाला घतला. दुचाकीवरून दोघेही कोगनोळीजवळील सेल टॅक्स नाक्यासमोर आले असता मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली.

मुंबईकरांनो, उद्या बाहेर फिरण्याचा प्लॅन करताय? जाणून घ्या मेगाब्लॉक कुठे अन् कधी असेल…

या अपघातात श्रेया गाडीवरून खाली पडली आणि ट्रकखाली गेली. यावेळी ट्रकचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने श्रेयाचा जागीच मृत्यू झाला, तर मामा शशीधर हे बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच निपाणीचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेहाचे निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, या अपघाताची माहिती श्रेयाच्या कुटुंबियांना देण्यात आली. कुटुंब देखील तत्काळ रुग्णालयात पोहोचले. श्रेया ही त्यांच्या आई-वडिलांना एकुलती एक होती. श्रेयाला पाहून कुटुंबाने हंबरडा फोडला. तिच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा असा परिवार आहे. इतक्या लहान वयात श्रेयाला मृत्यूने गाठल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here