गुवाहाटी: अरुणाचल प्रदेशातून गुजरातला नेण्यात येणाऱ्या हत्तींमुळे आसाममध्ये गोंधळ झाला. अरुणाचल प्रदेशच्या नमसाईतून २० हत्ती गुजरातच्या जामनगरला हत्ती नेले जात होते. मध्यरात्रीच्या सुमारास हत्तींना घेऊन जाणारे ट्रक अरुणाचल प्रदेश-आसाम सीमा ओलांडत होते. त्यावेळी स्थानिक रस्त्यावर आले. त्यांनी हत्तींच्या वाहतुकीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.अरुणाचल प्रदेशातून २० हत्ती गुजरातला नेले जात आहेत. त्यांची वाहतूक ट्रकमधून सुरू आहे. २० एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजता या ट्रक्सनी अरुणाचल प्रदेश-आसाम सीमा ओलांडली. हत्तींना घेऊन जाणारे ट्रक २१ एप्रिलच्या सकाळी तेझपूरला पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र काही स्थानिकांनी हत्तींच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. करणाऱ्यांवर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. हत्तींच्या वाहतुकीबद्दलचे परवाने, कागदपत्रं दाखवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली. आसाम-अरुणाचल सीमेवर स्थानिक रात्री जमले. त्यांनी हत्तींची वाहतूक करणारे ट्रक रोखून धरले. कागदपत्रांची मागणी केली. हत्तींच्या वाहतुकीसाठी वापरले जाणाऱ्या ट्रक्सवर गुजरातच्या नंबर प्लेट होत्या. हत्तींची तस्करी केली जात असावी असा संशय स्थानिकांना होता. घटनेची माहिती मिळताच तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर पोलिसांनी ट्रकांना सुरक्षितस्थळी नेलं. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निर्देशावरूनच हत्तींचं स्थलांतर करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. हत्तींची वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं असल्याचं पोलिसांकडून स्थानिकांना सांगण्यात आलं. ती कागदपत्रं स्थानिकांना दाखवण्यात आली. त्यानंतर हत्तींचा पुढील प्रवास सुरू झाला.
Home Maharashtra रात्रीच्या अंधारात २० हत्तींची वाहतूक; गुजरातला चाललेले, ग्रामस्थांनी अडवले; प्रकरण काय?