म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी हॉस्पिटल) मेडिसीन विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. के. शेषाद्री गौडा (वय २८) यांनी रसायनाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी बेगमपुरा परिसरातील श्रद्धा अपार्टमेंटमध्ये उघडकीस आला. डॉ. गौडा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत, मनोविकाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.

डॉ. गौडा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून एम. डी. पूर्ण केली आहे. त्यांनी एम. डी. मेडिसीन मध्ये सुवर्णपदक मिळवले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मेडिसीन विभागात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. ते दोन मित्रांसह बेगमपुऱ्यातील श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांचे रूममेट सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास फ्लॅटवर गेले असता वारंवार दार वाजवूनही डॉ. गौडा यांनी प्रतिसाद दिला नाही. ते दार उघडत नसल्याने त्यांच्या मोबाइलवर कॉल केला असता तो बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मित्रांनी बेगमपुरा पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक सय्यद सिद्धिकी हे पथकासह श्रद्धा अपार्टमेंटमध्ये पोहोचले. यावेळी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर बनावट चावी करणाऱ्याला बोलावण्यात आले. पोलिसांनी दार उघडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता डॉ. गौडा यांनी स्वत:ला सलाइन लावलेले व बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता ते मृत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याजवळ एका पानाची सुसाइड नोट पोलिसांना सापडली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली असून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. डॉ. गौडा यांच्या आत्महत्येमुळे घाटी हॉस्पिटलमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Bमनोविकारामुळे आत्महत्या?B

डॉ. के. शेषाद्री गौडा हे मूळ कर्नाटकातील रहिवासी होते. ‘आपण मनोविकाराने त्रस्त होतो. यातून बाहेर पडण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही. गेल्या १५ दिवसांपासून आत्महत्येचे विचार मनात घोळत होते. या आजारामुळे आत्महत्या करीत असून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे चिठ्ठीत नमूद केले असल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here