बैरूत: बैरूतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटाप्रकरणी १६ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त लेबनॉन सरकारच्या वृत्तसंस्थेने दिले आहे. आतापर्यंत १८ जणांची चौकशी करण्यात आली आहे. ये सर्वजण कस्टम आणि बंदर अधिकारी, कर्मचारी आहेत. मंगळवारी झालेल्या स्फोटानंतर तातडीने चौकशी सुरू करण्यात आली.

बैरूतमध्ये झालेल्या या भीषण स्फोटामध्ये ठार झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत १४० जण ठार झाल्याची माहिती असून पाच हजारांहून अधिकजण जखमी झाले आहेत. लेबनॉनच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट २७५० टन अमोनियम नायट्रेटचा साठा योग्य पद्धतीने न ठेवल्यामुळे झाला. या स्फोटासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून झालेले अक्षम्य दुर्लक्षपणाच जबाबदार असल्याचे म्हटले जाते. या स्फोटामध्ये बैरूत बंदर उद्धवस्त झाले असून परिसरातील इमारतीही कोसळल्या आहेत. जवळपास तीन लाख नागरीक बेघर झाले आहेत.

पाच भारतीय जखमी

बैरूतच्या स्फोटामध्ये पाच भारतीयही जखमी झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या पाच भारतीयांना किरकोळ दुखापत झाली आहे. लेबनॉनमधील भारतीय दूतावास सातत्याने भारतीयांच्या संपर्कात आहे. त्याशिवाय सर्वप्रकारची मदत करण्यात येत आहे. लेबनॉन सरकारच्या मदतीसाठी भारताकडून मदत पुरवण्यात येणार आहे. भारत सरकारने लेबनान सरकारकडून झालेल्या नुकसानीची माहिती मागितली आहे. त्याआधारेच भारताकडून लेबनॉनला किती मदत द्यायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, स्फोटामुळे बंदरावरील धान्याचे कोठार नष्ट झाले असून, देशाला लागणाऱ्या एकूण धान्यापैकी ८५ टक्के धान्याचा साठा या ठिकाणी केला जातो. अर्थ आणि व्यापारमंत्री राउल नेहमो यांनी देशाला पुरेल, इतका धान्याचा साठा असल्याचा निर्वाळा दिला आहे. लेबनॉनमध्ये मुख्य बंदरच उद्ध्वस्त झाल्याने आवश्यक वस्तूंची आयात देशामध्ये कशी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बैरूतमध्ये आतापर्यंत झालेला हा सर्वांत भीषण स्फोट आहे. इस्राइलबरोबर लेबनॉनचा संघर्ष असून १९७५ ते १९९०दरम्यानच्या नागरी युद्धातही हा देश आघाडीवर होता.

वाचा:

लेबनॉनमध्ये मदत व बचावकार्यासाठी इतर देशही सरसावले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशियापासून युरोपीयन महासंघ, रशिया, अमेरिका आदी देशांनी मदत व बचावकार्यासाठी पथक पाठवली आहेत. यामध्ये मोबाइल हॉस्पिटल, श्वान पथकांचाही समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील लेबनॉनमध्ये आपली वैद्यकीय मदत पाठवली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here