बेंगळुरूतील एका खासगी कंपनीचे मालक अविनाश प्रभू यांनी कर्मचारी हरीप्रसाद जोशी याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तक्रारीनुसार, हरीप्रसाद जोशी हा बऱ्याच महिन्यांपासून आपल्या पीएफचे पैसे मिळावेत, अशी मागणी प्रभू यांच्याकडे करत होता. मात्र, करोना संकट असून या काळात व्यवसाय ठप्प झाला आहे. तसेच माजी बिझनेस हेडकडून पीएफ संदर्भात सर्व कागदपत्रे अद्याप दिलेली नाहीत. त्यामुळे करोनाचे संकट दूर झाल्यानंतर पीएफविषयी काही निर्णय घेण्यात येईल, असे प्रभू यांनी जोशी याला सांगितले.
आर्थिक चणचणीमुळे जोशी त्रस्त झाला होता. यावरून प्रभू आणि त्याच्यात फोनवर वाद झाला होता. त्या दरम्यान जोशीने प्रभू यांना शिवीगाळही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याने प्रभू यांना शिवीगाळ केल्यानंतर तुला काय करायचे आहे ते कर, असे आव्हान कर्मचाऱ्याला दिले. त्यामुळे रागाच्या भरात कर्मचाऱ्याने प्रभू आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने ऑनलाइन वेबसाइटवरून सेक्स टॉयची ऑर्डर केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रभू यांनी कर्मचाऱ्यावर अनेक आरोप केले आहेत. कर्मचाऱ्याने मला, पत्नी आणि मुलांना अनेक आक्षेपार्ह मेल पाठवले आहेत. तर पत्नीचा मोबाइल क्रमांकही एका डेटिंग साइटवर शेअर केला आहे. याविषयी प्रभू यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कर्मचाऱ्याविरोधात आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कर्मचाऱ्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times