पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला शनिवारी २२ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेनिमित्त खास आंब्यांची आरास करण्यात आली होती. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर रत्नागिरीतील ११ हजारहून अधिक आंब्यांनी सजवण्यात आलं होतं.साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला होता. या दिवशी आंबा महोत्सव साजरा करण्यात आला. त्यासाठी मंदिरात सकाळी सहा वाजता आंब्याची सजावट करण्यात आली होती. त्यानंतर २४ तासांत ही सजावट उतरवण्यात आली. बाप्पाच्या सजावटीसाठी वापरण्यात आलेले आंबे काढल्यानंतर ते अनाथाश्रमातील मुलं, ससून रुग्णालयातील रुग्ण, वृद्धाश्रम आणि मंदिरात आलेल्या भाविकांमध्ये वाटण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं आकर्षक स्वरुप, गाभाऱ्यात २१ हजार सूर्यफुलांची आरास

पुण्यातील आंब्यांचे प्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवाले मंदार देसाई आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीने बाप्पाला हे आंबे दान करण्यात आले होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बाप्पाला आंब्यांचा नैवेद्य दाखवण्याची तसंच आंब्याची सजावट करण्याची ही वार्षिक परंपरा आहे. तसंच आंबा हे गणपती बाप्पाचं आवडतं फळ असल्याचंही मानलं जातं. आंबा व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या हस्ते हे आंबे दान करण्यात आले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे खजिनदार महेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ हजार आंबे सजावटीसाठी वापरण्यात आले होते. त्यापैकी आंब्यांपैकी ५० टक्के आंबे हे धर्मादाय संस्थांना वाटण्यात आले. त्यानंतर बाप्पाची आरती झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के आंबे भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात आले. सजावटीसाठी वापरण्यात आलेले सुमारे १२०० आंबे ससून रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले.

बाप्पाच्या सजावटीसाठी वापरलेले आंबे सहज स्वच्छ करून खाता येतील अशा पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

आंब्याच्या सजावटीचे डेकोरेटर सुभाष सरपाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत मंदिराचा परिसर सजवण्यासाठी जवळपास ५० कामगारांनी रात्रंदिवस काम केलं. झेंडूच्या फुलांनी साडेपाच फुटांची सजावट करण्यात आली. मंदिराभोवती आंब्याचं आणि फुलांचं तोरण, फुलांची सजावट करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here