Crime News:  पैशाच्या हव्यासापोटी इतरांना संपवल्याचा अनेक घटना आपण पहिल्या असतील, पण पैशासाठी स्वतःलाच संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. जिवंत माणूस मृत दाखवून ‘एलआयसी’कडून (LIC) दोन कोटी रुपये लाटण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला आहे. वर्ष 2015  ते 2023 च्या दरम्यानचा हा संपूर्ण प्रकार असल्याचे तपासात समोर आले आहे. 

अहमदनगर केडगाव येथील दिनेश टाकसाळे याने एप्रिल 2015 मध्ये मुंबईतील दादर एलआयसी शाखेकडून दोन कोटींचा विमा घेतला होता. दिनेश टाकसाळे दोन वर्षे विम्याचे वार्षिक हप्तेही भरले. पैशाच्या हव्यासापोटी त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवून एलआयसी या विमा कंपनी दोन कोटींचा दावा दाखल केला. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता दिनेश जिवंत असल्याचे समोर आले आणि हा संपूर्ण प्रकार समोर आला. नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी शिवारात झालेल्या चारचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तो मृतदेह दिनेश टाकसाळे याचा असल्याचा दावा करण्यात आला होता.

विशेष म्हणजे अपघातातील मृत व्यक्ती हा दिनेशच असल्याचे दाखवण्यासाठी दिनेश आणि त्याच्या साथीदारांनी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे यांच्याकडून बनावट मृत्यू दाखला घेतला होता. मात्र, विमा घेतल्यानंतर दोन वर्षातच दिनेशचा मृत्यू झाल्याचे दाखवणे. 25 डिसेंबर 2016 ला अपघात झाल्यानंतर 14 मार्च 2017 ला तातडीने विम्याची रक्कम मिळावी यासाठी दावा दाखल करणे यावरून कंपनीच्या  अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर या दाव्याची कसून चौकशी केली त्यात हा प्रकार समोर आला.

पैशाच्या हव्यासापोटी जिवंत असताना स्वतः मृत दाखवण्यासाठी जो मृतदेह आरोपींनी वापरला तो नेमका कुणाचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 25 डिसेंबर 2016 ला बेळवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला होता, त्यावेळी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल यांना संबंधित प्रकारावर संशय का आला नाही? डॉक्टरांप्रमाणेच संबंधित पोलीस कर्मचारी या संपूर्ण प्रकरणात सहभागी आहे याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची बेळवंडीतून बदली झाली संगमनेरच्या घारगाव येथे सध्या तो कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या प्रकरणी बेळवंडी पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश देऊनसुद्धा संबंधित कर्मचारी हजर झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.

news reels reels

श्रीगोंदा परिसरात असे बेवारस मृतदेह अनेकवेळा सापडतात मात्र, वर्षोनुवर्षे त्यांचा तपास लागत नाही असं श्रीगोंदा येथील नागरिक सांगतात.

विमा कंपनीने या प्रकरणी चौकशी करत असताना दिनेश टाकसाळेच्या खऱ्या आईकडे चौकशी केली तर आपला मुलगा जिवंत असल्याचे तिने सांगितले. तर, विम्याच्या राक्कमेसाठी दावा करणारी आई देखील बनावट असल्याचे पोलिसांना समजले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे यांना अटक केली आहे तर  मुख्य आरोपी दिनेश टाकसाळे, त्याचे सहकारी अनिल लटके, विजय माळवदे यांना अटक केली आहे.

‘एलआयसी’च्या दादर शाखेचे सहायक प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश साहू यांनी  शिवाजी पार्क (मुंबई) पोलिस ठाण्यात 21 फेब्रुवारी 23 ला रोजी तक्रार दिली होती. या प्रकरणात जो मृतदेह वापरण्यात आला कुणाचा होता, तो अपघातच होता की दिनेश आणि त्याच्या साथीदारांनी त्याचा घातपात केला हे पोलीस तपासात समोर येईल, अशी अपेक्षा आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here