मुंबई: मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूनं सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. राजस्थान रॉयल्सचा ७ धावांनी पराभव करत बंगलुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. सात सामन्यात त्यांनी चार विजय मिळवत आठ गुणांची कमाई केली आहे. आरसीबीनं राजस्थानचा पराभव केला असला तरी या सामन्यात कर्णधार शून्यावर बाद झाला. ट्रेंट बोलनं कोहलीला भोपळादेखील फोडू दिला नाही. कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विराट कोहली बाद झाल्यानंतर २३ एप्रिलची चर्चा सुरू झाली आहे. २३ एप्रिल ही तारीख विराटसाठी अनलकी ठरताना दिसत आहे. कोहली आरसीबीकडून खेळताना २३ एप्रिल या तारखेला तीनवेळा शून्यावर बाद झाला आहे. २३ एप्रिल २०१७ रोजी आरसीबीचा संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला. त्यावेळी नॅथन काऊल्टर नायलनं त्याला शून्यावर माघारी धाडलं. त्यानंतर २३ एप्रिल २०२२ रोजी कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मार्को जॅन्सेननं त्याला बाद केलं. विशेष म्हणजे या दोन्ही दिवशी विराटसोबतच आरसीबीचा डावही ढेपाळला. २३ एप्रिल २०१७ रोजी आरसीबीचा डाव अवघ्या ४९ धावांत संपुष्टात आला. तर २३ एप्रिल २०२२ रोजी सनरायझर्स हैदराबादनं आरसीबीचा अवघ्या ६८ धावांत खुर्दा उडवला. कालच्या सामन्यात सुदैवानं आरसीबीचा संघ ढेपाळला नाही. कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर फाफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलनं १२७ धावांची भागिदारी रचली. मॅक्सवेलनं ७७ धावा चोपल्या त्याला फाफ ड्यू प्लेसिसनं चांगली साथ दिली. त्यामुळे आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना १८९ धावा केल्या.प्रत्यु्त्तरादाखल राजस्थाननं सुरुवातीला झटके बसूनही चांगली लढत दिली. यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पड्डीकलनं शतकी भागिदारी केली. यानंतर हर्षल पटेल आणि कंपनीनं राजस्थानला धक्के दिले. ठराविक अंतरानं राजस्थानच्या विकेट्स जात होत्या. त्यामुळे आरसीबीनं ७ धावांनी सामना जिंकला. आरसीबीनं सलग दोन सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात कोहलीनं संघाचं नेतृत्त्व केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here