म. टा. वृत्तसेवा, भोर: तालुक्यातील कापूरहोळ येथे अज्ञात दरोडेखोरांनी पोलीसांच्या वेशात सराफाच्या दुकानात घुसून केला आणि लाखो रूपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली. गुरूवारी संध्याकाळी साडेचार वाजता ही घटना घडली.

बालाजी ज्वेलर्समध्ये ही लूट झाली. दोन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुमित निकम यांचे हे दुकान आहे. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे हा सर्व प्रकार सुरू होता. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो चित्रित झाला आहे. दरोडेखोरांनी दुकानांत चार आणि हवेत दोन गोळ्या झाडल्या, तसेच पाठलाग करणाऱ्यांवरही गोळीबार केला. मात्र सुदैवाने त्यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. दोन पिशव्यांमध्ये सर्व मुद्देमाल भरून दरोडेखोर साताऱ्याच्या दिशेने चारचाकीतून पळून गेले. पोलीस रात्री उशिरापर्यंत चोरी झालेला मुद्देमाल आणि दरोडेखोरांबाबत माहिती घेत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोड्याच्या घटनेबाबत माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी पोहोचले. बारमाही वर्दळ असलेल्या या चौकात करोनाच्या संकटामुळे शांतता होती. त्याचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी सिनेस्टाइल लूटमार केली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहीतीनुसार, साडेचारच्या सुमारास कारमधून पाच जण आले. त्यातील दोघे पोलिसांच्या, तर तिघे साध्या वेशात होते. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यामुळे त्यांच्याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. दुकानात गेल्यानंतर पोलीस वेशातील एकाने मालकाकडे ‘या चोराकडील चोरीचे सोने तुम्ही घेतले आहे’ अशी विचारणा करून मालकाच्या कानशिलात लगावली. पिस्तुल त्यांच्या डोक्याला लावले. त्यामुळे तेथे असलेला मालकाचा मुलगा ओरडला. त्यामुळे दोघा दरोडेखोरांनी त्यांना दुकानाच्या आतील बाजूस नेऊन डांबून ठेवले. तोपर्यंत तिघांनी दुकानातील सर्व ऐवज दोन पिशव्यांमध्ये भरला होता. पिस्तुलातून चार गोळ्या दुकानात झाडल्या. त्यामुळे आजूबाजूचे लोक सावध झाले. बाहेर येऊन हवेत गोळ्या झाडल्या. पाचही दरोडेखोर पिशव्या घेऊन कारच्या दिशेने जात असताना, काही जणांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी त्यांच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यानंतर कारमध्ये बसून साताऱ्याच्या दिशेने निघून गेले. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली. बारामतीचे अप्पर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ व त्याचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here