मुंबई :महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर नोकरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. नोकरी मिळवण्यासाठी तरुण- तरुणी संघर्ष करताना दिसतात. युवक नोकरीसाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या कष्टाचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना अनेकदा आपल्या समोर येत असतात. मुंबई सारख्या महानगरांमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून युवकांची फसवणूक केली जाते. असाच एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई मेट्रोत नोकरी देण्यासंदर्भात एक पोस्टर व्हायरल होत आहे. अनेकांनी यासंदर्भात तक्रार आणि विचारपूस केल्यानंतर महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सध्या अशा प्रकारची भरती सुरु नसल्याचं सप्ष्ट करण्यात आलं आहे.
मेट्रो २ अ व ७ चे संचालन करणाऱ्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कंपनीत (एमएमएमओसीएल) नोकरी मिळत असल्याची एक पोस्ट सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. परंतु, अशी कुठलिही भरती किंवा निवड प्रक्रिया सुरू नसल्याने अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन एमएमएमओसीएलने केले आहे.
‘मुंबई मेट्रो २ अ व ७ ला तातडीने तंत्रज्ञांची गरज आहे. याअंतर्गत मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम आदी क्षेत्रातील पदविकाधारकांना घेतले जात आहे. इच्छुकांनी ८१०८५-५१०६२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे किंवा Sandeep_jairam1980@rediffmail.com वर संपर्क साधावा’, अशी पोस्ट व्हायरल झाली आहे. परंतु ही पोस्ट पूर्णपणे बनावट असून त्याला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘ही जाहिरात बनावट असून मुंबई मेट्रो २अ आणि ७ अंतर्गत अशी कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही. नागरिकांनी अशा बनावट संदेशांना वा जाहिरातींना बळी पडू नये. तसेच आमच्या सर्व जाहिराती https://www.mmmocl.co.in या संकेतस्थळावरच प्रदर्शित केल्या जातात. तेथून माहिती घ्यावी’, असे एमएमएमओसीएलने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, युवकांनी नोकरीसाठी अर्ज करताना सर्व बाबी खऱ्या असल्याची शहानिशा करुन घेणं आवश्यक आहे.