कोल्हापूर :महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि भारतीय कुस्ती महासंघ या दोघांमधील वादामध्ये कुस्तीपटू आणि पंचांची कुचंबना होत आहे. याचे परिणाम आज होत असलेल्या कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरही पडत आहे. स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही? अशा बुचकळ्यात अनेक स्पर्धक पडले आहेत. तर सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेती प्रतीक्षा बागडी ही आपली सांगलीतील महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा बाजूला ठेवून पुन्हा कोल्हापूरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होत आहे. यामुळे खरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणती? यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.पत्रक काढत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा इशारा

भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीमार्फत आजपासून कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. यासाठी महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यावेळी उपस्थित राहणार आहेत. यासाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुढाकार घेतला आहे. खरतर कुस्तीगीर परिषद व कुस्ती महासंघामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीची लढाई फेब्रुवारीपासून रंगली होती. पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथे स्पर्धेची घोषणा संयोजकांनी केली होती. अखेर पुण्यातील स्पर्धा रद्द करून कोल्हापुरात निश्चित झाली. दरम्यान, कुस्तीगीर परिषदेने सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी आयोजन केले. तर या स्पर्धेला महाराष्ट्रातून महिला कुस्तीगिरांनी हजेरी लावली. त्यामध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला चितपट करत केसरी किताब जिंकला.
कोणाचा कंडका पडणार? राजाराम कारखान्याची मतमोजणी सुरू; सतेज पाटील, महाडिकांची प्रतिष्ठा पणाला
आता खरी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणती? हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पत्रक काढत कोल्हापूर येथे होत असलेली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अनधिकृत आहे. त्यामध्ये कोणीही सहभागी होऊ नये असे सांगण्यात आले आहे. तसेच जर कोणी पंच आणि स्पर्धक सहभागी झालेच, तर त्यांच्यावर कुस्तीगीर परिषदेकडून कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
कार २० फूट नदीत कोसळली, चक्काचूर झाला, तरीही ५ जण वाचले; कोल्हापुरातील घटनेने सगळेच अवाक्
आमची स्पर्धा अधिकृत- दिपाली सय्यद

दिपाली सय्यद यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोल्हापूर येथे होत असलेली आमचीच स्पर्धा अधिकृत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद ही बरखास्त झालेली आहे. आमची स्पर्धा ही भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीमार्फत होत आहे. या स्पर्धेत खेळणारा खेळाडू हा राष्ट्रीय पातळीवरील असणार आहे. आमची स्पर्धा अनधिकृत असती तर सांगलीमध्ये विजेती झालेली प्रतीक्षा बागडी या स्पर्धेत सहभागी झाली नसती. तिच्या दृष्टीनेही हीच स्पर्धा अधिकृत आहे, असे दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत. यामुळे जर कोल्हापूरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रतीक्षा बागडी शिवाय अन्य कोणी विजेती झाल्यास पहिली महिला महाराष्ट्र केसरी नेमकी कोण? हा प्रश्न सदैव अनुत्तरितच राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here