सोमवारी संध्याकाळपासूनच या सगळ्या परिसरात स्थानिक ग्रामस्थ एकत्र आले आहेत. आणि ते येथून हलण्यास तयार नाहीत. या सगळ्या प्रकरणात काही ग्रामस्थ आणि विरोधक ऐकण्यास तयार नसल्याने पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली आहे. बारसू सोलगाव परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे.
सर्वेक्षणासाठी एक भला मोठा कंटेनरही या परिसरात दाखल झाला आहे. सर्वेक्षणासाठी येत असलेल्या अधिकारी आणि पोलिसांच्या गाड्यांच्या समोर रिफायनरी विरोधक महिलांनी आडवे होत रस्त्यावरच झोपल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वेक्षण थांबवत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला आहे. या ठिकाणी पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
दरम्यान, या ठिकाणी दाखल झालेल्या प्रसारमाध्यमांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचा आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे. आपण या ठिकाणी पुढे जाऊन मनाई आदेशाचा भंग करू नका, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही बाजूला करण्यात आलं आहे.
राजापूरमध्ये सर्वेक्षणाची तयारी सुरू आहे. दुसरीकडे ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनावर बोलण्यासाठी एकही राजकीय नेता समोर आलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरातील आमदार राजन साळवी हे आहेत. तेही गेले काही दिवस या परिसरात दिसले नाहीत. सरकारकडून रिफायनरी प्रकल्प बाबत ग्रामस्थांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News