मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या सुरात सूर मिसळत बारसू रिफायरनरीला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची बाजू मांडली. यावेळी उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांनी २०२२ मध्ये बारसू प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्र सरकारला लिहलेले पत्र सर्वांसमोर मांडून ठाकरे गटावर डाव उलटवण्याचा प्रयत्न केला. जे बारसू प्रकल्पाला विरोध करत आहेत त्यांनीच १२ जानेवारपी २०२२ रोजी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते.

या पत्रात उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, रिफायनरीसाठी आम्ही बारसूमध्ये १३०० एकर जमीन आणि नाट्यामध्ये १३४४ एकर जमीन देऊ शकतो. या जमिनीपैकी ९० टक्के जमिनीवर घरं, मानवी वस्ती नाही. झाडी नाही, वाडी नाही. त्यामुळे प्रकल्पामुळे कुठलंही घर किंवा वाडी विस्थापित होणार नाही. तसेच या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुदृढ होईल, जीडीपी वाढेल. तसेच पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात कर कमी होईल. त्यामुळे हा प्रकल्प बारसू येथे करावा. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पत्र कशासाठी लिहलं, कोणाशी चर्चा केली, हे मला माहिती नाही. आज एकनाथ शिंदे यांच्या जागी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर बारसू रिफायनरी प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाला असता, असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

रिफायनरी सर्वेक्षण: मला हॉस्पिटलला जायचं नाही, जे व्हायचं ते इथेच होऊ दे; ती महिला चक्कर आल्यानंतरही हटली नाही

दुटप्पी राजकारण, आता राज्यात प्रकल्प येतोय, तर विरोध का करता; उदय सामंतांचा सवाल

उदय सामंत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पासाठी लिहलेल्या पत्रातील मुद्दे सविस्तरपणे मांडत ठाकरे गटाचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केला. बारसू रिफायनरीसाठी आज भू सर्वेक्षण सुरु झाले म्हणजे उद्या लगेच प्रकल्प सुरु होणार, असे नाही. सध्या याठिकाणी कंपनीकडून सॉईल टेस्टिंग केले जात आहे. बारसू आणि नाटे परिसरातील ६५ टक्के जनता या प्रकल्पाच्या बाजूने आहे. मात्र, सरकार प्रकल्प विरोधकांशीही चर्चा करायला तयार आहे. आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे गैरसमज दूर करू. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी समृद्धी महामार्गालाही विरोध केला होता. परंतु, तत्कालीन एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून समृद्धी महामार्ग पूर्ण करण्याची भूमिका घेतली. पुढे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होता. परंतु, तो सफल झाला नाही. आताही बारसू प्रकल्पाबाबत ठाकरे गटाकडून दुटप्पी राजकारण सुरु आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले.

बारसू रिफायनरी परिसरात राजकीय नेते, अधिकारी, परप्रांतीयांची जमीन खरेदी; काँग्रेस नेत्याचेही नाव, खळबळजनक दावा

बारसूमध्ये सध्या कोणतेही आंदोलन सुरु नाही. आंदोलकांवर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प हा कोकणाचा विकास करणारा प्रकल्प आहे. ठाकरे गटाचे स्थानिक आमदार राजन साळवी हे प्रकल्पाच्या बाजूने आहेत. येथील खासदार प्रकल्पाच्या विरोधात आहे. मुंबईतील काही लोक बारसूमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड होईल, असे म्हणत आहेत. एकूणच हा प्रकल्प येणार नाही, याची तजवीज करण्यात आली आहे. हे दुटप्पी राजकारण आहे. हे ठरवून केलेलं राजकीय षडयंत्र आहे. स्थानिक जनतेने त्याला बळी पडू नये. यापूर्वी ठाकरे गटाने फॉक्सकॉन सारखे प्रकल्प राज्याबाहेर गेले तेव्हा पत्रकार परिषदा घेतल्या. मग आता राज्यात प्रकल्प येत आहे, तर त्याला विरोध का करत आहात? ठाकरे गट आता आम्ही स्थानिकांसोबत असल्याचे सांगत आहे. मग उद्धव ठाकरे यांनी तेव्हा बारसू प्रकल्प सुरु करण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र का पाठवले, असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला.

रिफायनरी वाद चिघळला, कोकणवासीय आक्रमक; आंदोलक महिलांना उष्माघाताचा त्रास, रुग्णालयात जाण्यास नकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here