विमान दरीत पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या विमानात एकूण १९० प्रवासी होते. यामध्ये १७४ प्रौढ, १० बालकं आणि ६ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. दीड तासाच्या आत बचावकार्य पूर्ण केलं गेलं. सर्व मौल्यवान वस्तू आणि इतर वस्तू साहित्य ताब्यात घेण्यात आलं आहे. कोझिकोडमधील ७ हॉस्पिटल्समध्ये ११० जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे, असं गोपालकृष्णन यांनी सांगितलं.
उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. मलप्पूरम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्यांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. विमानाच्या मागील बाजूस अडकलेल्या दोन प्रवाशांना मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढता आलं. धावपट्टीवर उतरण्यापूर्वी विमानाने दोन वेळा विमानतळाला फेऱ्या मारल्या. मी मागच्या सीटवर होतो आणि मोठा आवाज झाला आणि त्यानंतर काय घडले हे मला माहिती नाही, असं विमानातील प्रवासी रियाज यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times