१८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नेहल वढेरा बाद झाला आणि त्याच्या जागी फलंदाजीला अर्जुन मैदानात आला. त्यानंतर डावाच्या अखेरच्या षटकात गुजरातकडून मोहित शर्मा गोलंदाजी करत होता. अर्जुनने त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला. मोहितने अर्जुनला शॉट चेंडू टाकला होता. पण प्रथमच फलंदाजी करणाऱ्या अर्जुनने शानदार पुल शॉट खेळला. हा त्याच्या आयपीएल करिअरचा पहिला षटकार ठरला आणि तो ७३ मीटर लांब गेला. अर्जुनच्या या षटकाराची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. २०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अर्जुन बाद देखील झाला. त्याने ९ चेंडूत १ षटकारासह १३ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १४४.४४ इतका होता.
फलंदाजीच्या आधी अर्जुनने गोलंदाजीत चमक दाखवली होती. २ षटकात फक्त ९ धावा देत त्याने वृद्धिमान साहाची विकेट मिळवली.
या लढतीत मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माचा हा निर्णय अंगलट आला. गुजरातने ६ बाद २०७ धावा उभ्या केल्या. विजयासाठी विशाल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा डाव कोसळला. त्यांना २० षटकात फक्त १५२ धावा करता आल्या.