‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’ची अंमलबजावणी महावितरणमार्फत केली जात आहे. योजनेत आतापर्यंत १५१३ मेगावॉट सौर ऊर्जा खरेदीचे करार झाले आहेत. त्यापैकी ५५३ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून २३० कृषी वाहिन्यांवरील १ लाख शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीजपुरवठा केला जातो. विजेची कमतरता लक्षात घेत ७६४ मेगावॉटचे करार प्रस्तावित असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले आहे. या ४५ लाख कृषिपंपांसाठी येत्या काळात ७ हजार मेगावॉट सौर ऊर्जेचे लक्ष्य निश्चित केले असून त्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ चा शुभारंभ नुकताच ऊर्जामंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा वापरून ७ हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्यासह २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्ष कार्यालयामध्ये सरकारी पत्रकार परिषद
विश्वास पाठक हे ऊर्जा विभागातील चारही कंपन्यांवर स्वतंत्र संचालक आहेत. तसेच प्रदेश भाजपचे प्रवक्ते आहेत. मात्र बुधवारच्या पत्रकार परिषदेचा विषय सरकारी अधिकृत योजनेसंबंधी होता. तसे असतानाही पाठक यांनी ही पत्रकार परिषदेत पक्ष कार्यालयात का घेतली, अशी चर्चा दिवसभर ऊर्जा विभागात सुरू होती.