म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईःलालबाग येथील गणेशगल्लीत भुपेश पवार (४२) याने ११ वर्षीय मुलीची गळफास लावून हत्या केली, त्यानंतर दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पत्नीमुळे आत्महत्या केल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केल्याने पोलिसांनी पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भूपेश याने पत्नीसह इतर काहींची नावे चिठ्ठीत लिहिली असून यात एका मंडळाच्या नावाचाही समावेश आहे.गणेशगल्लीमध्ये भूपेश हा पत्नी आणि मुलीसह वास्तव्यास होता. शेअर्स ब्रोकर म्हणून काम करणाऱ्या भूपेशचे कार्यालय लोअर परळ परिसरात आहे. मंगळवारी सायंकाळी पत्नी घरी परतली तेव्हा भूपेश आणि मुलगी मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना याठिकाणी दोन पानांची चिठ्ठी आढळली. यामध्ये पत्नीमुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने नमूद केले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा भुपेशला संशय होता. त्यावरून त्यांची वारंवार भांडणे व्हायची. याला कंटाळून त्याने प्रथम मुलीला गळफास देऊन मारले आणि नंतर आत्महत्या केली. पती-पत्नीच्या भांडणात ११ वर्षांच्या मुलीची काय चूक, बापाने रागाच्या भरात दोघांचा जीव घेतला चिठ्ठीसोबत त्याने काही रोख रक्कम आणि दागिनेही ठेवले होते. रक्कम आणि दागिने कुणाला कसे वाटायचे याबाबत त्याने चिठ्ठीत लहून ठेवले आहे. इतकेच नाही तर कार्यालयातून काही रक्कम येणे असून तीदेखील कोणाला द्यायची हे भुपेशने लिहिले आहे. पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.