विद्यार्थ्यांना ओलीस ठेवण्यात आल्याचं म्हणत आरोपीनं सगळ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. विद्यार्थी आणि शिक्षक घाबरल्यानं पाहून देब बल्लभनं त्यांच्या दिशेनं बंदूक रोखली आणि आरडाओरडा सुरू केला. ‘आरोपी एखाद्या पालकासारखा शाळेत आला होता. त्यानं आमच्या बंदूक रोखली आणि आम्हाला एका कोपऱ्यात बसायला सांगितलं. त्याच्या अटकेनंतर शाळेतील सर्व वर्गातील मुलांना घरी सोडण्यात आलं,’ अशी माहिती वर्गशिक्षिका प्रतिभा महंत यांनी दिली.
मुचिया आंचल चंद्रमोहन हायस्कूलमध्ये एक अज्ञात व्यक्ती शिरल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याच्याकडे शस्त्र असल्याचं आम्हाला कळलं. त्या व्यक्तीची पत्नी आणि मुलांशी संबंधित काहीतरी समस्या होती. त्यामुळे त्यानं हा प्रकार केला. आरोपीचं वय ४० असून त्याला अटक करण्यात आली आहे, असं मालदाचे पोलीस अधीक्षक प्रदीप कुमार यादव यांनी सांगितलं.
पत्नी आणि मुलगा वर्षभरापासून बेपत्ता आहेत. प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी शाळेत बंदूक घेऊन शिरलो आणि दहशत निर्माण केली, असं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. देब बल्लभ पत्नीपासून वेगळा राहतो. त्याचा मुलगादेखील त्याच्या पत्नीसोबतच राहत असल्याचं आरोपीच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. पोलिसांना त्याच्याकडे एक बंदूक, केमिकलनं भरलेल्या दोन बाटल्या आणि एक चाकू सापडला आहे.