गरीबातला गरीब भाविकही येथिल दानपात्रात दान टाकतो. ज्यात नाण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हजारो किलोंची नाणी प्रत्येकवेळीच्या मोजदादच्या वेळी संस्थानला प्राप्त होत असते. प्रत्येक मोजदादच्या वेळी जवळपास चार ते पाच लाखांची नाणी दानपात्रात मिळून येतात. वर्षाकाठी सरासरी पाच ते सहा कोटी रुपयांची नाणी येथील दानपात्रात मिळून येतात. वर्षानुवर्षे येथिल रोकड स्वीकारणाऱ्या बॅंकांकडे कोट्यावधी रुपयांची नाणी पडून आहेत. एकतर नाण्याचे वजन आणि दुसरे म्हणजे जागेची कमतरता. त्यामुळे बॅंकांनी साई संस्थानच्या कोट्यावधींच्या ठेवीवर पाणी सोडलं होतं. बँकांनी चक्क कॅश काउंटिंगला येण्यास नकार दिला होता.
शिर्डी शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी साई संस्थानची रोकड मोजदाद स्वीकारण्यासाठी असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर साई संस्थानने थेट भारतीय रिझर्व्ह बँकेशीच संपर्क करून यात मार्ग काढण्याची विनंती केली होती. अखेर आरबीआयचे बेलापूर शाखेचे जनरल मॅनेजर मनोज रंजन दास यांनी शिर्डीत येवून साई संस्थान आणि शिर्डीतील तेरा राष्ट्रीयीकृत बँकांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. संयुक्तरित्या पार पडलेल्या या बैठकीत नाण्यांवर तोडगा निघाला आहे.
ज्या भागात नाण्यांचा तुडवडा आहे, त्या भागात शिर्डीतील राष्ट्रीयीकृत बँकेत पडून असलेली कोट्यावधी रुपयांची नाणी वितरित केली जाणार आहे. यामुळे शिर्डीतील बँकांचा नाण्यांचा बोजा कमी होणार आहे. जागा रिकामी होणार असल्याने त्या बॅंकांनी आता साई संस्थानची दान रक्कम स्वीकाराण्यासाठी तयारी दर्शवली असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.