जळगाव: जळगावातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. पावसामुळे सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून आज शनिवारी दुपारी अभिनव आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कमळाची कृत्रिम फुले सोडून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.

वाचा:

शहरातील सर्वच रस्ते अतिशय खराब झाले आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकण्यासाठी शहरासह प्रमुख उपनगरांमध्ये प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळातील रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले होते. हे काम संथगतीने सुरू असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली होती. रस्त्यांवरील खड्डे, धूळ यामुळे जळगावकर नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल ओरड होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, आता पावसामुळे शहरातील रस्त्यांचे पुन्हा एकदा तीनतेरा वाजले आहेत. सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहने चालवताना कसरत करावी लागते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक लहानमोठे अपघात होऊन नागरिकांना दुखापत होत आहे. अनेक वाहन चालकांना पाठीचे, मानेचे तसेच मणक्याचे विकार जडत आहेत. हे कमी काय, रस्त्यांवरून वाहन चालताना धूळ उडत असल्याने श्वसनाचे विकार देखील नागरिकांना जडत आहेत. रस्त्यांची अशी दुर्दशा झालेली असताना महापालिका प्रशासन मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. याच विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी शिवसेनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कमळाची आर्टिफिशियल फुले सोडून शिवसेनेने महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपचा निषेध नोंदवला. या आंदोलनात शिवसेनेचे निलेश पाटील, गजानन मापुरे, संजय कोल्हे, पुथ्वीराज सोनवणे, सोहम विसपुते, मंगला बारी, जितेंद्र बारी आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा

जळगावकरांनी एकहाती सत्ता देऊनही भाजपचे आश्वासन हवेत विरले आहे. विकास तर सोडा पण रस्ते, पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सुविधा पुरवणे देखील भाजपला जमत नाहीये. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, नागरिकांना दररोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येत्या ८ दिवसात शहरातील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here