नवी दिल्ली :तुमच्यासमोर एका बाजूला आहे भारत आणि दुसरीकडे हजारो मैलांवर आहे आफ्रिकन देश सुदान. सुदानमधल्या लष्कर आणि निमलष्कराच्या युद्धात भीषण परिस्थिती झालीय, शेकडो लोकांचा मृत्यू झालाय आणि त्यात जवळपास तीन हजार भारतीयही अडकलेत. मोदी सरकारने या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरीची सुरुवात केली, पण आफ्रिका खंडात असलेल्या सुदानमधून, तेही युद्धपरिस्थितीमध्ये भारतीयांना परत आणण्यासाठी भारताला एका देशाची सर्वात मोठी मदत झाली आणि तो देश म्हणजे सौदी अरेबिया. २०१५ ला मोदींच्या विनंतीखातर दोन तासांसाठी युद्ध थांबवणाऱ्या सौदीने सुदानमधून येणाऱ्या भारतीयांसाठी आपलं विमानतळ खुलं केलं आणि शेकडो जीव वाचवता आले. पण सुदानमधून भारतीयांची सुटका नेमकी कशी केली जातेय, सौदी आणि भारताच्या मैत्रीचं नवं उदाहरण कसं समोर आलंय आणि सुदानमधल्या युद्धपरिस्थितीत जिथे अमेरिकेनेही माघार घेतली तिथे ऑपरेशन कावेरीची चर्चा का आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.सुदानमध्ये विविध देशांचे जे लोक अडकलेत त्यात सर्वाधिक म्हणजेच जवळपास १६ हजार लोक अमेरिकेचे आहेत. मात्र अमेरिकेने या सर्वांना घरातच राहण्याचं आवाहन करुन मदतीसाठी हात वर केलेत. प्रत्येक देश आपापल्या परीने नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे आणि बाहेर येण्यासाठी भारताला सर्वात मोठा मार्ग सापडलाय तो म्हणजे सौदी अरेबियाचा.

भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध आधीपासूनच चांगले राहिलेत. तर सुदानमधून लाल समुद्र ओलांडल्यानंतर सौदीतलं प्रसिद्ध जेद्दा शहर लागतं आणि याच जेद्दा पोर्टवर भारतीयांना आणलं जातंय. यासाठी सुदानमधील भारतीय दुतावास आणि सौदीतील दुतावास समन्वय साधत आहे. सुदानला लागून इजिप्त, दक्षिण सुदान, इरिट्रिया आणि चाड यांच्यासारखे इतर देशही आहेत. मात्र सोयीसुविधांच्या आणि चांगल्या संबंधांच्या बाबतीत सौदी हा पर्याय भारताने निवडला आणि ऑपरेशन कावेरीची सुरुवात केली. सौदीने भारताला यापूर्वीही २०१५ मध्ये युद्धकाळातही अशीच मदत केली होती.

Operation Kaveri

ऑपरेशन कावेरी

२०१५ ला काय झालं होतं?

२०१५ ला सौदी आणि यमन यांच्या युद्धात साडे चार हजार भारतीयांसह ४१ देशांच्या नागरिकांना भारताने सुरक्षित परत आणलं. दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी २०१८ मध्ये २०१५ च्या बॅकडुअर डिप्लोमसीचा किस्सा सांगितला. यमनमध्ये आकाशातून बॉम्ब पडत होते, जमिनीवर सैन्य होतं आणि पाण्यातही संकट होतं. या परिस्थितीत भारतीयांना वाचवण्याचं मिशन सुरू करण्याचा निर्णय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीचे किंग सुलमान बिन अब्दुल अजीज यांना फोन केला. मोदींनी सात दिवस युद्ध थांबवण्याची विनंती केली, यानंतर सौदीने विचार करण्यासाठी एक तास मागितला. एका तासानंतर सौदीच्या राजाचा फोन आला आणि आठवडाभर दररोज दोन तास युद्धविराम देण्याची तयारी दर्शवली. यानंतर तत्कालीन माजी परराष्ट्र राज्यमंत्री व्हीके जनरल सिंह यमनला गेले आणि बचावकार्य सुरू झालं.

२०१५ नंतरही भारताने अनेक देशात बचावकार्य केलं.. करोनाच्या काळातलं बचावकार्य असो किंवा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणणं असो, भारताने यावेळीही तत्परतेने ऑपरेशन कावेरीची सुरुवात केली आणि भारतीय जहाजं समुद्रात तयार झाली.

Operation Kaveri

ऑपरेशन कावेरी

सुदानमध्ये नेमकी युद्धपरिस्थिती कशामुळे?

सुदानच्या लष्कराने आधी सरकार उलथवून टाकलं, त्यानंतर निमलष्करासोबत संघर्ष पेटला या संघर्षानंतर लष्कर आणि निमलष्कर आमनेसामने, यात आतापर्यंत ४५० पेक्षा जास्त मृत्यू, तर ४ हजारपेक्षा जास्त जखमी सुदानची राजधानी खौर्तुममध्ये भीषण युद्धपरिस्थिती, त्यामुळे सुरक्षित प्रवासाठी अडचणी गेल्या १५० वर्षांपासून भारत आणि सुदानचे संबंध, त्यामुळे अनेक भारतीय सुदानमध्ये स्थायिक कर्नाटकातील हक्की-पिक्की आदिवासी सुदानमध्ये आयुर्वेदिक औषधं विकतात सुदानमध्ये ओएनजीसी, भेल, टीसीआयएल, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, बजाज ऑटो यांसारख्या कंपन्या भारतातील अपोलोसारखे रुग्णालयही सुदानमध्ये, त्यामुळे अनेक भारतीय नोकरीसाठी स्थायिक ऑपरेशन कावेरी अंतर्गत आतापर्यंत ११०० पेक्षा जास्त भारतीयांची सुरक्षित सुटका सर्व भारतीयांचं बचावकार्य पूर्ण होईपर्यंत सौदीच्या मदतीने मिशन सुरुच राहणार.

Operation Kaveri

ऑपरेशन कावेरी

लाल समुद्राच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांचं बचावकार्य तुलनेने सहज मानलं जातंय. मात्र सुदानच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे चाड देशाच्या बाजूने राहणाऱ्या नागरिकांचा लाल समुद्राच्या बंदरापर्यंतचा प्रवास हा सर्वाधिक खडतर असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येतायत. मात्र भारतीय दुतावास यासाठी भारतीयांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here