बारसू महाराष्ट्रातच आहे की आणखी कुठे? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच जर तुम्ही ते काहीच शेतकरी आहेत असे समजत असाल तर राज्यातील सर्व शेतकरी आम्ही एकत्र आणू आणि बारसूच्या शेतकऱ्यांमागे ताकद उभी करु, असा सांगत चलो रत्नागिरीचा नारा त्यांनी पुकारला आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्राचार्य जालिंदर पाटील यांच्यासह कार्यकर्ते रत्नागिरी येथील बारसूला निघाले असता त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बारसूचे ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच या भूमिकेवरती ठाम आहेत. पोलीस प्रशासनाने माती परीक्षण होऊ द्या, असं आवाहन केल्यानंतरही शेतकरी ते न होऊ देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या भूमिकेने त्रस्त झालेल्या पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर अनेकांना पिंजऱ्यात भरुन पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं. या प्रकाराविरोधात राजू शेट्टी आक्रमक झाले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी चलो रत्नागिरीचा नारा दिला आहे.
जी शेती करतो, ती शेती प्रकल्पासाठी देण्याची शेतकऱ्यांची इच्छा नसेल तर जबरदस्ती कशासाठी? लोकशाही राज्यात शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करत आहे. पोलिस शेतकऱ्यांना मारझोड करत आहेत, त्यांना शरम वाटत नाही का? असे सवाल करुन राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढलेत.
लोकशाही राज्यात अशा पद्धतीचे अत्याचार सहन करून घेतले जाणार नाही. सरकार जर हे काहीच शेतकरी आहेत असे समजून त्यांच्यावर लाठीचार्ज करत असतील तर आम्ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांना बारसूमध्ये एकत्र येण्याचं आवाहन करू, असे म्हणत बारसू शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी चलो रत्नागिरीचा नारा राजू शेट्टी यांनी दिलाय.