म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या रस्तेदुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा आणि भ्रष्टाचार सुरू असून, याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच, दुरुस्तीसाठी वापरला जाणारा पैसा हा नागरिकांचा असल्याने कुठे व कसा वापरला जाणार याची श्वेतपत्रिका महापालिकेने प्रसिद्ध करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रिती शर्मा-मेनन यांनी केली आहे.पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. दरवर्षी रस्तेकामांसाठी पालिकेकडून हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. तरीही खड्डे काही कमी होत नाहीत. यावर्षीसुद्धा पालिकेने खड्डेमुक्त रस्ते बनविण्याचा निर्धार केला असून, रस्तेदुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. पालिकेचा हा बोगस कारभार असल्याची टीका मेनन यांनी केली.

येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पालिकेने सहा हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच, खड्डे बुजवण्यासाठी १२५ कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे. शहर व उपनगरांसाठी आणखी ८० कोटी खर्च केला जाणार आहे. रस्त्यांवरील खड्डे, निकृष्ट दर्जाचे पट्टे, पुनर्पृष्ठीकरण अशा विविध कामांसाठी आधीच कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार असताना आता मुंबई शहर व उपनगरांमध्ये हिच कामे करण्यासाठी ७० ते ८० कोटी अधिक खर्च कशासाठी, अशी विचारणा ‘आप’ने केली आहे.

ही सर्व कामे कंत्राटदारांना देताना निविदाप्रक्रिया कायदेशीररित्या सर्व नियम व अटीचे पालन करून दिली जातात काय, याचीसुद्धा सखोल चौकशी व्हायला हवी. एकीकडे पालिकेकडून रस्त्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, त्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे खर्चाचे प्रमाण मात्र वाढते आहे, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे.

‘आयुक्तांचीही चौकशी करा’

मागील पाच वर्षांचा हिशेब केला तर असे पालिकेकडून १० हजार कोटींहून अधिक खर्च रस्त्यांवर करण्यात आला आहे. तरीसुद्धा मुंबईतील खड्डे कायम आणि नागरिकांचे हाल सुरूच आहेत. पालिकेकडून मुंबईतील रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे. तसेच इक्बालसिंह चहल हे मुंबई पालिकेचे आयुक्त हे प्रशासक असून त्यांचीसुद्धा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मेनन यांनी केली आहे.
लाकडी बाके होणार इतिहासजमा, विद्यार्थ्यांना आरामदायी आसनव्यवस्था देण्याचा निर्णय
आप’ म्हणते…

– भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी
– पालिकेने याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी

काँग्रेसचे म्हणणे…

– नवीन निविदा आकलनापलीकडच्या
– त्या कंत्राटदारांना अधिक पैसे कमावता यावेत यासाठीच

नवीन निविदा कंत्राटदारहितासाठी

मुंबई : महापालिकेने रस्तेदुरुस्ती, खड्डे बुजवण्यासाठी काढलेल्या नवीन निविदांवर मुंबई काँग्रेसने टीका केली आहे. या निविदा कोणाच्याही आकलनापलीकडच्या असून, कंत्राटदारांना अधिक पैसे कमावता यावेत, यासाठी त्या काढण्यात आल्या आहेत, अशी टीका काँग्रेस नेते व पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.

पालिकेचे अधिकारी कंत्राटदारांना मदत करण्याचे मार्ग नेहमीच शोधत असतात. खड्डे बुजवण्यासाठी आधी १२५ कोटींहून अधिक खर्चाच्या निविदा काढल्या असताना आणखी ७० ते ८० कोटींच्या निविदा ही नागरिकांच्या पैशांची लूट आहे. पावसाळापूर्व प्रतिबंधात्मक देखभालीचे काम आणि रस्त्यांवरील निकृष्ट पट्ट्यांचे आपत्कालीन काम या नावाखाली काढलेल्या या निविदा कोणते प्रतिबंधात्मक काम करणार आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पालिकेत सध्या निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन जबाबदारीशून्य पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची विनंती राजा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here