म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती आणि दूषित पाण्याच्या पुरवठ्याच्या तक्रारी मुंबईकरांकडून केल्या जातात. या पाणीगळतीचा शोध घेणे आव्हानात्मक असते. जलवाहिन्यांमधील गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी ‘क्राऊलर’ कॅमेऱ्याचा वापर करण्यात येतो. पालिकेकडे असलेल्या या कॅमेऱ्याची मुदत संपुष्टात आल्याने आता अद्ययावत आणि नवीन तंत्रज्ञान अंतर्भूत असलेला कॅमेरा वापरात आणला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. या कॅमेऱ्याच्या वापरामुळे खंडित पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.जलवाहिन्यांच्या अतिशय क्लिष्ट अशा वितरण जाळ्यामुळे पाण्याची गळती अथवा दूषित पाणीपुरवठ्याचे ठिकाण शोधणे हे आव्हान असते. यासाठी पालिकेच्या जलअभियंता विभागाकडे स्वमालकीचा क्राऊलर कॅमेरा आहे. परंतु पाच ते सात वर्षेच वापरण्याची मुदत असलेला हा कॅमेरा तब्बल १२ वर्षे वापरला जात आहे. अनेक वर्षांचा वापर आणि देखभाल-दुरुस्तीनंतर आता तो सक्षम राहिलेला नाही. त्यामुळे नवा अद्ययावत कॅमेरा घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

नवा कॅमेरा दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. या कालावधीत कॅमेऱ्याच्या देखभालीची जबाबदारी सेवापुरवठादार कंपनीची असणार आहे. सीसीटीव्ही असणाऱ्या विशेष उपकरणाच्या माध्यमातून जलवाहिनीच्या आतमध्ये हा कॅमेरा वापरून दृश्य टिपता येणार आहे. अद्ययावत कॅमेऱ्याच्या माध्यमातून नेमके ठिकाण, घटनास्थळाचा व्हिडीओ रेकॉर्ड करणे शक्य होणार आहे. यासाठी प्रखर दिव्यांची प्रकाशयोजना कॅमेऱ्यात करण्यात आली आहे. अनेकदा खोदकाम करूनही गळतीचे नेमके ठिकाण सापडत नाही, अशा ठिकाणी हा कॅमेरा उपयुक्त ठरणार आहे.

हॉटेलात असताना अतिकच्या मारेकऱ्यांकडे…; मॅनेजरच्या जबाबानं सस्पेन्स वाढला; ते दोघे कोण?
असा आहे ‘क्राऊलर’

‘क्राऊलर’ हा चाकांच्या आधारावर चालणारा आणि वायर रिमोटने हाताळणी शक्य असणारा कॅमेरा असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. कर्मचाऱ्यांद्वारे जलवाहिन्यांमधील गळती शोधणे शक्य नसलेल्या ठिकाणी हा कॅमेरा उपयुक्त ठरतो. याच्या वापरामुळे जलवाहिनीचा आकार, आतील रुंदी किंवा निरीक्षण केलेले अंतर अशी सर्व आकडेवारी उपलब्ध होते. यातून गळतीचे नेमके ठिकाण किंवा दूषित स्रोत शोधणे शक्य होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here