रत्नागिरी : कोकणातील बारसू येथे शुक्रवारी पुन्हा झालेल्या संघर्षानंतर तीन दिवसांसाठी हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. काही व्हिडिओ समोर आल्यावरही बारसू येथे आंदोलकांवर लाठीचार्ज झाला नाही, असा दावा जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी केला आहे. तसंच पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या खासदार विनायक राऊत व त्यांच्यासोबतच्या आठ ते दहा पदाधिकाऱ्यांना सोडण्यात आलं आहे. अनेक ग्रामस्थ व महिलांचीही शुक्रवारी संध्याकाळी उशिरा सुटका करण्यात आली. ग्रामस्थांची करण्यात आलेली धरपकड आणि उन्हाळ्यामुळे अनेकांना झालेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन दोन ते तीन दिवस स्थगित करण्यात आल्याची माहिती रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे पदाधिकारी दीपक जोशी यांनी दिली आहे. पुढील तीन दिवसांत माती परीक्षणाचे काम थांबले नाही तर आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांचे नेते काशिनाथ गोरले यांनी दिला आहे.रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम आणि विनेश वालम यांना अटी-शर्थींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. काल रात्री या दोघांना अटक करण्यात आली होती. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांना अटक झाली होती. अशोक वालम यांना ३१ मे पर्यंत जिल्हाबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले होते, तर ३१ मेपर्यंत विनेश वालम यांना तालुकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांकडून ग्रामस्थांवर करण्यात आलेला लाठीचार्ज हा लोकशाहीचा घातक असल्याची प्रतिक्रिया अशोक वालम यांनी दिली आहे.

अतिक-अशरफ हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा युपी सरकारला सवाल; रुग्णालयाच्या बाहेर गाडी का थांबवली?

प्रकल्पाबाबत आज महत्त्वाची बैठक

बारसू रिफायनरीबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत प्रकल्पविरोधी ग्रामस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काही तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आज अखेर सर्व्हेचे पाच ड्रिल पूर्ण झाले आहेत. पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जमाव ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु चर्चेदरम्यान ग्रामस्थ निघून गेले, असा दावा प्राशसनाकडून करण्यात आला आहे.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here