या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे नेते तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री सुरेश खाडे, भाजपाचे खासदार संजय काका पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र भाजपाला बाजार समिती निवडणुकीमध्ये आपलं खातं देखील उघडता आलं नाही.
ऐतिहासिक विजय; औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 16 जागांवर भाजप
इस्लामपूर या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येत आघाडी उभे केली होती. अनेक वर्षांपासून आपली सत्ता अबाधित राखण्यात जयंत पाटील यांना यश मिळाले आहे. सर्व पक्ष एकत्रित आलेले असताना जयंत पाटलांनी इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हाती सत्ता मिळवलेली आहे. येथे १८ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे उमेदवार हे विजय झालेले आहेत.
दरम्यान, विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे पानिपत झाले आहे. या ठिकाणी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सर्व १८ जागांवर शिवसेना, भाजप, काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम व भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अरुण लाड, राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र एकाही जागेवर राष्ट्रवादीला यश मिळालं नाही.