बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अरुण हगवणे यांचा पराभव केला आहे. निकम यांच्या बंडखोरीमुळे मंचर बाजार समितीच्या निवडणुकी कडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निकम हे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून संपूर्ण आंबेगाव तालुक्याला त्यांची ओळख आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद तसेच लोकसभेची उमेदवारीही दिली होती. एक व्यक्ती एक पद असे राष्ट्रवादीत निर्णय झाल्याने नवीन चेहऱ्यांना संधी देत निकम यांचा पत्ता उमेदवारी यादीतून अखेरच्या क्षणी कापण्यात आला होता. त्यामुळे निकम यांनी केलेल्या बंडखोरीची आंबेगाव, पुण्यासह राज्यभरात चर्चा होती.
निकम यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे काही दिवसापासून वळसे पाटील आणि निकम यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा रंगलेल्या पहायला मिळत होत्या. मात्र आजच्या निकालात बंडखोर असलेले देवदत्त निकम यांना विजयी यश मिळाले असून वळसे पाटील यांची सत्ता आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात देवदत्त निकम काय निर्णय घेतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांच्या पॅनलच्या विरोधात लढत देणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा मात्र पराभव झाला आहे.