सांगली: सांगलीच्या जतमध्ये झालेल्या मायलेकींच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा खून अटकेत असलेल्या पतीने नव्हे तर त्यांच्याच भावकीतल्या तरुणांनी केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे करणी करत असल्याच्या संशयातून रागाच्या भरात तिघा तरुणांनी मिळून हा खून केल्याचं स्पष्ट झाले असून या प्रकरणी दोघांना उमदी पोलिसांनी अटक केले आहे.जत तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या मायलेकीच्या खून प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुणीकोन्नूर येथे २३ एप्रिल २०२३ रोजी प्रियांका बेळुंखे (वय ३२) आणि मोहिनी बेळुंखे (वय १४) या दोघी मायलेकींचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. बेळुंखे वस्तीवर राहणाऱ्या झोपडीमध्ये मायलेकींचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी महिलेच्या पतीवर संशय व्यक्त करत चारित्र्याच्या संशयातून त्याने हा खून केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर उमदी पोलिसांनी संशयित बिराप्पा बेळुंखे यास अटक केली होती.

समृद्धीवर अपघात; ट्रकला धडकून पोलिस वाहनाचा चक्काचूर, महिला पोलिस निरीक्षकाने जीव गमावला
बिराप्पा बेळुंखे याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्याची सखोल चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडून खुनाची कबुली देण्यात आली नव्हती. यादरम्यान, काही गोष्टी समोर आल्या. मात्र, सदरचा खून केला नसल्याचं बिरापा याने वारंवार सांगितले. त्यानंतर बिराप्पा बेळुंखे यांनी सांगितलेल्या काही माहितीच्या आधारे उमदी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांनी याप्रकरणी कुणीकोनूर गावात सखोल तपास सुरू केला.

खुनाच्या घटनेनंतर अक्षय रामदास बेळुंखे, विकास महादेव बेळुंखे आणि बबल्या बेळुंखे हे तिघे तरुण गायब असल्याची बाब समोर आली. यानंतर अक्षय आणि विकास बेळुंखे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता या दोघांनी आणि बबल्या बेळुंखे असे तिघांनी मिळून सदर खून केल्याची कबूली दिली आहे, अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांनी दिली आहे.

मृत प्रियांका बेळुंखे आणि संशयित अक्षय बेळुंखे यांचे घर शेजारी-शेजारी आहे. या दोन्ही कुटुंबांमध्ये नेहमी वाद होत असतात. मृत महिला प्रियांका बेळुंखे यांच्याकडून अक्षय बेळुंखे यांच्या कुटुंबावर करणी-धरणीचा प्रकार करण्यात येत होता,असा संशय अक्षय याच्या कुटुंबाला होता. तर गेल्या सहा महिन्यांपासून अक्षय बेळुंखे याचे वडील गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. तसेच, एक महिन्यांपूर्वी अक्षय याचा भाऊ विजय बेळुंखे याचा मृत्यू झाला आहे.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

हा सर्व प्रकार प्रियांका बेळुंखे यांच्याकडून करण्यात आलेल्या करणी-भानामतीच्या मुळे झाला आहे, असा संशय अक्षय आणि त्याच्या कुटुंबांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. सदर महिलेकडून संपूर्ण कुटुंबावर करणी करण्याचं काम सुरूच आहे, असा देखील संशय होता. या संशयाच्या रागामधून २३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अक्षय बेळुंखे, विकास बेळुंखे आणि बबल्या बेळुंखे या तिघांनी मिळून प्रियांका बेळुंखे यांचा दोरीने गळा आवळून हा खून केला आहे.

खून केल्यानंतर त्या ठिकाणी प्रियांका बेळुंखे यांची मुलगी मोहिनी बेळुंखे पोहोचली होती. तिने सदरचा प्रकार पाहिला. त्यामुळे या तिघांनी मग मोहिनी बेळुंखेचा देखील दोरीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह तेथेच टाकून ते पसार झाले होते अशी कबुली अटक करण्यात आलेल्या दोघांनी दिली आहे, अशी माहिती देखील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात पवार यांनी दिली आहे.

तोंडात कपडा घातला, केमिकलने जाळलं, गळा आवळला; पोटच्या पोरीसोबत बापाचं भयंकर कृत्य, कारण काय?
उमदी पोलिसांनी मायलेकींच्या खुनाच्या प्रकरणी अत्यंत सखोल आणि सजगत्याने केलेल्या तपासामुळे सर्व प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मायलेकींच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मृत महिलेचे पती वीरप्पा बेळुंखे यांचा कोणताही संबंध नसल्याचे समोर आले आहे, शिवाय ते निर्दोष असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here