भिवंडी, ठाणे : भिवंडीच्या वळगावातील वर्धमान कंपाउंडमध्ये तीन मजली इमारतीचा अर्ध्याहून अधिक भाग शनिवारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी एनडीआरएफसह टीडीआरएफच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आज जवळपास २० तासानंतर एका व्यक्तीला ढिगाऱ्या खालून बाहेर काढले. एका ३० वर्षीय व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे.भिवंडीत २० तासांनी एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. बचाव कार्यात असलेल्या जवानांनी सकाळी ८ वाजता सुनिल बाळू पिसाळ (वय ३०) यांना सुखरुप बाहेर काढलं. त्यांना तातडीने भिवंडीच्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाहेर येताच सुनिल पिसाळ यांना रडू कोसळले. बचावकार्यातील जवानांचे रडत रडत त्यांनी हात जोडून आभार मानले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचा आज वाढदिवस असल्याचे बोलले जात आहे.

आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू

भिवंडीच्या वळगावातील वर्धमान कंपाउंडमध्ये तीन मजली इमारतीचा अर्ध्याहून अधिक भाग शनिवारी दुपारी कोसळला. या भीषण दुर्घटनेमध्ये लहानगीसह तिघांचा मृत्यू झाला. नवनाथ सावंत (वय ३५) आणि ललिता रवी मोहतो (वय २९), सोना मुकेश कोरी (अंदाजे ५ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर इमारतीच्या ढिगाऱ्यामधून रात्री उशिरापर्यंत नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यातील सात जणांवर भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात उपचार चालू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठीएनडीआरएफ, टीडीआरएफसह इतर यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

मोठी बातमी! भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; तब्बल ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती; Video
मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. भिवंडीत शनिवारी दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

चिमाजी आप्पांनी जिंकलेला ठाण्यातील ऐतिहासिक किल्ला नामशेष, पुरातत्व विभागाची धक्कादायक कबुली
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत. पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचावकार्य व्यवस्थित पार पाडावे तसेच, जखमींना त्वरित रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत असे निर्देशही त्यांनी प्रशासनास दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here