मुलाला गुजराती भाषेतील पेपर आल्यानं पालकांनी याबद्दल मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. त्यावर मुख्याध्यापक राम वाघुंबरेंनी उलट उत्तरे दिली. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. कोणाकडे जायचे असेल तिथे जा, अशा उत्तरामुळे पालक पूर्णपणे गोंधळून गेले. गुजराती भाषेतील प्रश्नपत्रिकेमुळे विद्याथ्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक विवंचनेत आहेत.
ज्यावेळेस नवोदयची परीक्षा सुरुवात तिचे फॉर्म भरण्याची वेळ होती, त्यावेळेस शिक्षकांनी निष्काळजीपणा केला. फॉर्म भरताना मराठी माध्यमाऐवजी गुजराती माध्यम लिहिले. त्यामुळे विद्यार्थ्याला गुजराती भाषेतील प्रश्नपत्रिका मिळाली. गुजराती भाषा येतच नसल्याने विद्यार्थ्याला काय करावे तेच कळेना. याबद्दल मुलाच्या पालकांनी मुख्याध्यापकांना विचारले असता, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा असे उत्तर त्यांनी दिले.
मटाच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक राम वाघुंबरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी शाळेत कर्मचारी वर्ग कमी असल्याचे कारण दिले. या प्रकाराला शिक्षक जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या शाळेत शेकडो विद्यार्थी आहेत. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. विद्यार्थ्याला १५ दिवसांपूर्वी हॉल तिकीट मिळाले होते. त्यामुळे त्यांनी हा प्रकार आधीच निदर्शनास आणून द्यायला हवा होता, असं वाघुंबरे म्हणाले.