अमरावती : मेळघाटात मागील काही वर्षांपासून वाघांचा मुक्त संचार होत आहे. वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशातच मेळघाटात झालेल्या वाघाच्या झुंजीत एक वाघ मृत्युमुखी पडल्याची घटना २९ एप्रिलला संध्याकाळी घडली. वन कर्मचारी गस्तीवर असताना वैराट वर्तुळमधील पचंबा बिट ३४ वनखंड क्रमांकमध्ये वाघ मरण पावल्याची घटना समोर आली.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबत माहिती दिली. सुमंत सोळंके उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा, इंद्रजीत निकम सहाय्यक वनसंरक्षक, डॉ. मयुर भैलुमे वनपरिक्षेत्र अधिकारी चिखलदरा तसेच NTCA आणि WII चे प्रतिनिधी राकेश महल्ले, अलकेश ठाकरे, वनपाल सावळे वनरक्षक शनवारे यांच्या उपास्थितीत मृत वाघाची पाहणी करण्यात आली. यावेळी डॉ. धांदर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी अहवालानुसार आणि पाहणी दरम्यान वाघाचे सर्व अवयव जसे की सर्व दात, सर्व नखे, वाघाच्या मिश्या आणि इतर अवयव जागेवर होते.
मेळघाटात वाघ मृतावस्थेत आढळला
प्रथम दर्शनी वाघ्याचा मानेवर दुसऱ्या वाघाच्या दाताच्या खुणा आढळून आल्या आहेत. वाघाच्या अंगावर दुसऱ्या वाघाने हल्ला केल्याचे ओरखडे दिसून आले आहेत. त्यावरून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणीनुसार प्रथम दर्शनी दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यु झाल्याचे दिसून येते. याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. आसपासच्या सर्व क्षेत्राची पाहणी करून पाणवठे तपासणी करून सदर जागेवर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, गेल्या महिन्यात देशातील वाघांची एकूण संख्या जाहीर करण्यात आली. अनेक महिन्यांपासून वाघांची संख्येची मोजणी कऱण्यात येत होती. आता वाघांची नवी आकडेवारी हाती आली आहे. गेल्या महिन्यात म्हैसूरमधील एका कार्यक्रमात ९ एप्रिलला वाघांची आकडेवारी जाहीर केली गेली. देशातील वाघांची संख्या ३ हजारांव गेली आहे. देशात सध्या ३१६७ असल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली. एकूणच देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या मोहीमेला यश येताना दिसत आहे. सध्या जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ हे भारतात आहेत.