सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. येत्या दोन महिन्यात मुंबई-ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृत महोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवर पण एसटी पोहचायची. आता सगळ्या ठिकाणी रस्ते झाले आहेत. मात्र एसटी अजूनही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, कारण एसटीला परंपरा आहे. नवीन संकल्पना, बदल घडताहेत. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षा आहेत, असे यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले.
काय आहे ईलेक्ट्रिक बसचे वैशिष्ट्य
संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाइल चार्जिंग आणि प्रकाशदिवे उपलब्ध असतील. बॅगा ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था असेल. बसमध्ये ४३ प्रवासी बसू शकतात. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे. ईलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषणमुक्त प्रवास होतो आणि इंधनावरील खर्च कमी करण्यास मदत होते. आरामदायी प्रवास होतो आणि या बसचा रस्त्यावर धावतांना आवाजही येत नाही. या शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आला आहे.
किती आहे तिकीट दर?
सध्या मुंबई-पुणे दरम्यानडिझेलवर चालणाऱ्या शिवनेरी बसचे तिकीट ५१५ रुपये आहे. पण डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसची ऑपरेटिंग कॉस्ट कमी आहे. ऑपरेटिंग कॉस्ट कमी असल्याने त्याचा लाभ प्रवाशांना मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच तिकीट दर कमी होतील, अशी आशा आहे. पण सध्यातरी ई-शिवनेरीचे तिकीट दर हे ५१५ रुपये इतकेच ठेवण्यात आले आहे. मात्र, प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
राज्यातल्या ९७ टक्के लोकांपर्यंत आज एसटी पोहचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे, याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले.
आम्ही गेल्या आठ नऊ महिन्यात राज्यातील थांबलेल्या कामांना चालना दिली. अगदी पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्या आयुष्यात बदल घडविणारे हे निर्णय आहेत. राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ८ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवाशी याचा लाभ घेत आहेत. यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी वळताहेत, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
स्वच्छ सुंदर बसस्थानक
एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवण्यात येईल. यात उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे ही प्रवाशांची अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे. त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बालपणापासून आपण एसटीचा प्रवास करत आलो, असे सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी यावेळी सांगितले. तसेच एसटी प्रवासातल्या वाहक चालकांच्या आठवणी सांगितल्या. आधुनिक काळाशी जोडून घेण्याची गरज असून एसटीचा कारभार सर्वांपर्यंत पोहचेल याची जबाबदारी मी घेईल, असेही ते म्हणाले.
यावेळी हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एक मिनिट स्वच्छतेसाठी … एक मिनिट महाराष्ट्रासाठी या दृकश्राव्य संदेशाचे तसेच एसटीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रमास परिवहन व बंदरे प्रधान सचिव पराग जैन, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.