सीएसएमटीहून कर्जतला जाणाऱ्या लोकलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडे कोणतंच ओळखपत्र सापडलं नाही.

मृत प्रवाशाच्या शर्टवर एक लेबल होते. त्यावर फॅशन टेलर, वांगणी-वेस्ट असा उल्लेख होता. त्यामुळे हा प्रवासी कर्जत जवळच्या वांगणी परिसरात राहणारा असावा, असा तर्क लढवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी वांगणीमधील फॅशन टेलर नावाच्या दुकानदाराचा शोध घेण्याच्या सूचना सहकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार वांगणीतील फॅशन टेलरचा शोध लागल्यानंतर त्याच्या मोबाईलच्या व्हॉट्स ॲपवर प्रवाशाचा फोटो पाठवण्यात आला.
मेहबूब नासिर शेख (५७) असे मृताचे नाव आहे. तो वांगणीमधील लक्ष्मी सोसायटीमध्ये राहत असल्याचे टेलरने पोलिसांना सांगितले. सदर रहिवाशाचा शर्ट आपणच शिवल्याची माहितीदेखील टेलरने पोलिसांना दिली. टेलर आणि डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी महेबूब यांचे घर गाठले. त्यांच्या कुटुंबियांना कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये मयताची ओळख पटवण्यासाठी येण्यास सांगितले. मेहबूब यांच्या पत्नीने पतीचा मृतदेह ओळखला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मेहबूब यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने आणि पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. के. पिंगळे आणि के. टी. पाटील यांनी या तपास कामात महत्वाची भूमिका बजावली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.