म. टा. प्रतिनिधी, : गॅस सिलिंडरमधून गळती होऊन झालेल्या स्फोटात भिंत कोसळली. यात शेजारील फ्लॅटमधील प्रौढाचा मृत्यू झाला. तर तीन कुटुंबांतील लहान मुलांसह १३ जण जखमी झाले आहेत. दिघी महादेवनगर येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये रविवारी (९ ऑगस्ट) ही घटना घडली.

ज्ञानेश्वर मधुकर टेमकर (वय ४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. टेमकर यांच्या पत्नी मंगला टेमकर (वय २७), मुलगी अनुष्का टेमकर (वय ७), मुलगा यशश्री टेमकर (वय अडीच वर्ष) यांच्यासह ज्यांच्या घरात स्फोट झाला ते महेंद्र हरिभाऊ सुरवाडे (वय ३८), अर्चना महेंद्र सुरवाडे (वय ३५), आकांक्षा महेंद्र सुरवाडे (वय १५), दिशा महेंद्र सुरवाडे (वय १३), अमोल महेंद्र सुरवाडे (वय १०) आणि टेमकर यांच्या घरी काही दिवसांपूर्वी आलेले पाहुणे सातपुते दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा व मुलगी हे जखमी झाले आहेत.

दिघी-भोसरी हद्दीवर असलेल्या अष्टविनायक सोसायटीमध्ये भिंत कोसळली आहे, अशी माहिती रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार, भोसरी अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्र गवळी, फायरमन विजय घुगे, श्रावण चिमटे, अभिषेक डिगे, हनुमंत पुरी, अनिल वाघ हे जवान अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य केंद्राचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले होते. गॅस सिलिंडरच्या स्फोटात भिंत कोसळल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले. स्थानिकांनी जखमींना पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. जखमींमध्ये तीन पुरुष, तीन महिला, दोन मुले आणि पाच मुलींचा समावेश आहे.

सुरवाडे यांच्या घरात शनिवारी रात्रीपासून गॅस सिलिंडरमधून गळती झाली होती. सकाळी त्यांच्या घरातील व्यक्तीने विजेच्या दिव्याचे बटण चालू केल्यानंतर हा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की त्यांच्या आणि टेमकर यांच्या घराची भिंत कोसळली. यात टेमकर यांचा मृत्यू झाला. तर अन्य सदस्य जखमी झाले. या घटनेत दोन्ही घरातील सर्व साहित्याची पडझड झाली आहे. भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here