म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेमागे केवळ वयोमान हे कारण नाही; तर, पक्षाच्या ‘रँक अँड फाइल’मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ठरवून घेतलेला निर्णय असल्याचे राष्ट्रवादीतील सर्वच ज्येष्ठ नेते खासगीत मान्य करीत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध कारणांमुळे अस्वस्थता असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने मध्यंतरी दिले होते. सध्या पक्षात चालू असलेल्या घडामोडी त्याचाच पुढील अंक आहे. शरद पवार यांच्या मनाविरुद्ध कोणताही राजकीय निर्णय घेण्याचा विचार पक्षात झाल्यास शरद पवार यांचे संपूर्ण राजकीय वजन संबंधितांच्या विरोधात जाईल. कुठल्याही बाहेरील दबावापुढे झुकून संपूर्ण पक्ष पोखरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शरद पवार यांच्या जनतेतील लोकप्रियतेशी झुंजावे लागेल, हाच इशारा या राजीनामा प्रकरणातून संबंधितांना दिला असल्याचे राष्ट्रवादीतील ज्येष्ठांचे म्हणणे आहे.

Sharad Pawar Resigns : पवारांच्या गुगलीने मॅच फिरली, राजीनामाअस्त्राने राष्ट्रवादीतील वेगळ्या विचाराच्या गटाची कोंडी
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक लोकप्रतिनिधी व दिग्गज नेते मंडळी ही सहकार क्षेत्रातील बडी धेंडे असल्याने साखर कारखाने, सहकारी बँका, पतपेढ्या, दूधसंघ, सूत गिरण्या आदींचा कारभार कसा करायचा, या प्रश्नाने बहुतांश राष्ट्रवादी पछाडलेली आहे. यातूनच भाजपसोबत घरोबा करावा, या मतापर्यंत राष्ट्रवादीतील अनेक नेते आले होते. मात्र या मताच्या विरोधातही अनेक नेते व कार्यकर्ते आहेत. स्वतः शरद पवार हेदेखील भाजपसोबत थेट घरोबा करण्याच्या विरोधात असल्याने त्यांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला होता. या घरोबा करू इच्छिणाऱ्या आमदारांचे नेतृत्व अजित पवार करत असल्याच्या बातम्या राष्ट्रवादीतूनच काहीजण ठामपणे सोडत होते. मात्र शरद पवार यांचे मन या निर्णयाच्या बाजूने वळविण्यासाठी अजित पवार यांनी बिलकूल पुढाकार घेतला नव्हता. शरद पवार यांच्या विश्वासातीलच पाच लोकांनी शरद पवार यांच्या भेटी घेऊन हे प्रयत्न केले होते. त्यामुळेच राष्ट्रवादीतील बहुतांश नेते आता फुटण्याच्या मार्गावर असल्याच्या जोरदार बातम्या प्रसार माध्यमांमधून सुरू झाल्या होत्या.

सभागृहात म्हणाले निर्णय आधीच ठरला होता, नंतर कोलांटउडी मारली, स्पष्टीकरण देता देता दादांची दमछाक
शरद पवार यांनी स्वतःच्या राजीनाम्याचा प्रस्ताव समोर ठेवत या सगळ्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडल्यानंतर उद्धव ठाकरे हे गलितगात्र होतील, हा सत्ताधाऱ्यांचा होरा सपशेल चुकल्याचे स्पष्ट झालेले असतानाच, आता शरद पवार ही उद्धव यांच्याप्रमाणेच पक्षांतर्गत विरोधकांसमोर उभे राहिल्यास त्यांच्या जनाधारात मोठ्या प्रमाणावर सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही सहानभूती नक्की किती असेल व त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होईल, याची भिती राष्ट्रवादीतील नेते व आमदारांच्या मनात आहे. आज शरद पवार यांनी प्रसार माध्यमांसमोरच हा राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात पवार यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनार्थ जमलेल्या त्यांच्या समर्थकांमध्ये हलकल्लोळ उडाला असून संपूर्ण महाराष्ट्रातील पवार यांच्या जनाधारामध्ये याची तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here