वाटेगाव येथील शेतकरी अनिल जाधव हे रविवारी सकाळी त्यांच्या वाटेगाव- शेणे या मार्गावरील शेतामध्ये गेले होते. त्यांना शेतात रंगीत पाठीचे कासव आढळले. हे कासव पकडून त्यांनी गावात आणले. नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचे कासव असल्याने लोकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. जाधव यांनी कासव सापडल्याची माहिती शिराळा वन विभागाचे वनकर्मचारी अंकुश खोत यांना दिली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाटेगावमध्ये पोहोचून कासव ताब्यात घेतले. ‘इंडियन स्टार टॉरटाइज’ हे आहे. ते भारत आणि श्रीलंकेत आढळते. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा अधिवास आहे. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी या जातीचे कासव आढळलेले नाही. त्यामुळे या परिसरात त्याचा अधिवास आहे की, तस्करीच्या माध्यमातून ते सांगली जिल्ह्यात पोहोचले याचा शोध वन विभागाकडून घेतला जात आहे.
दुर्मिळ जातीचे हे कासव बाळगण्यास बंदी आहे. मात्र त्याच्याबाबत अनेक अंधश्रद्धा असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. हे कासव घरात ठेवल्यानंतर समृद्धी होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात त्याची तस्करी होते, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times