राज्यातील केंद्रीय व प्रदेश नेते, विशेष निमंत्रित अशी सुमारे बाराशे जणांची टीम राहणार आहे. दर तीन वर्षांनी कार्यकारिणीची नव्याने रचना केली जाते. जुन्या कार्यकारिणीला साडे तीन वर्षे झाली आहेत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी सज्ज होणार आहे. ४८ लोकसभा आणि विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक जाहीर केले जाणार आहे. नवीन जिल्हाध्यक्षांची टीम या महिन्याच्याअखेरपर्यंत सज्ज होईल. संघटनात्मक बदलाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असा दावाही त्यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अमित शहा यांना भुईसपाट करण्याची भाषा करणारे ठाकरे केव्हा भूईसपाट होतील, कळणार नाही. ठाकरे नावाची नाटक कंपनी आहे. ते बारसूच्या बाजूने होते, आता नौटंकी करत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत संख्या बघावी. तुम्ही सहाव्या क्रमांकावर आहात, त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर समोर आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला.
तीन वर्षांपासून तुमचा भोंगा वाजतो आहे. आमचे मुख्य विशेष प्रवक्ते नितेश राणे यांनी उत्तर देताच त्यांचा अवमानकारक उल्लेख केला जातो. संजय राऊत यांना सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यास सांगा मग कळेल, असे आव्हानही बावनकुळे यांनी ठाकरे यांना दिले.