मुंबई : शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. याच शक्यशक्यतांच्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन अंदाजांवर आधारित बातम्या करणं थांबवा, असं आवाहन माध्यमांना केलं. तसेच कार्यकर्त्यांनी धीर ठेवावा आणि नेत्यांनी राजीनामे देणं थांबवावं, असं आवाहनही पटेल यांनी केलं. यावेळी सुप्रिया सुळे आणि तुमच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा असल्याचं पत्रकारांनी विचारल्यावर ‘राजकीय चातुर्य’ दाखवत प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्नांचा निकाल लावला.

मुंबईतील वाय बी चव्हाण प्रतिष्ठान येथे आज सकाळी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला जयंत पाटील यांना निमंत्रण नसल्याचं वृत्त माध्यमांनी चालवलं. त्याचवेळी जयंत पाटील यांचा नाराजीचा सूर असल्याचंही बोललं गेलं. याच सगळ्या विषयांवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रफुल्ल पटेल यांनी आपली मतं मांडली.

शरद पवार यांच्यासारख्या देशातील मोठ्या नेत्याने एवढा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे म्हणजे काहीतरी विचार करुन निर्णय घेतला असेल. लोकांच्या, कार्यकर्ते, नेते-पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांनी फेरविचारासाठी दोन-तीन दिवस मागितले आहेत. त्यांनी अजूनही आम्हाला कोणतंही म्हणणं सांगितलं नाही. जर त्यांनी निर्णय फिरवला नाही तर समिती सदस्यांच्या एकमताने आम्ही दुसरा अध्यक्ष निवडू, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

Sanjay Raut: त्यांचा पक्ष तरी त्यांना गांभीर्याने घेतो का? राहुल गांधी माझ्याशी… राऊतांकडून नानांचा पाणउतारा
सुप्रिया सुळे आणि तुमच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा

सुप्रिया सुळे आणि तुमच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरु असल्याचं पत्रकारांनी विचारल्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, मी सध्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर काम करत आहे. हे पद माझ्यासाठी गौरवशाली आहे. मुंगेरीलाल के हसीन सपने मी पाहत नाही. मी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अजिबात इच्छुक नाही, त्याला मी तयारही नाही. राहिला विषय सुप्रिया सुळे यांचा… तर एका चॅनेलला मुलाखत देताना छगन भुजबळ यांनी ताईंविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्या त्यांच्या व्यक्तिगत भावना होत्या… अशा शब्दात त्यांनी चर्चांचे प्रश्न निकाली काढले.

राष्ट्रवादीतल्या संघर्षामुळे पवारांनी राजीनामा दिला का?

राष्ट्रवादीत संघर्ष असल्याच्या बातम्या केवळ माध्यमांमधून येतात. राष्ट्रवादीत कोणताही संघर्ष नाही. राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे. शरद पवार कायमच सर्वेसर्वा असतील, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

जयंत पाटील नाराज आहेत का?

वाय बी चव्हाण सेंटरमधील बैठकीला पक्षाला माझी गरज वाटली नसेल, असं वक्तव्य आज सकाळी जयंत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं. यावरुन जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. याचप्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, जयंतरावांचा कोणताही वेगळा सूर नाही. ते अजिबात नाराज नाहीयेत. कारखान्याच्या बैठकीच्या निमित्ताने ते पुण्याला गेले होते, संध्याकाळपर्यंत मुंबईत परततील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here