नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मृतदेहांची अवहेलना झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नगरसेवक बोराटे यांनी पालिका आयुक्तांकडे याची तक्रार करताना या प्रकाराचे फोटो सुद्धा निवेदनाला जोडले आहेत. दोन दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार असून जनआक्रोश आंदोलन करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वाचा:
बोराडे आपल्या निवेदनात म्हणतात, ‘काल माळीवाडा भागातील मित्राच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले. त्यांना पाहण्यासाठी मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी इतकी दयनीय अवस्था होती की काल दिवसभरातील करोनमुळे मृत्यू झालेल्या १२ पेशंटचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेत अमरधाम येथे नेण्यासाठी टाकण्यात आले होते. यात चार महिलांच्या व आठ पुरुषांच्या मृतदेहाचा समावेश होता. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पाहताना मन हेलावून गेले. करोनामुळे एखादा व्यक्ती जर उपचारादरम्यान मयत झाला असेल, तर त्याची सुद्धा जिल्हा रुग्णालय महापालिकेकडून अवहेलना सुरू आहे. मयत झालेल्या रुग्णांना जर अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार घडत असेल तर ही बाब अतिशय धक्कादायक आहे,’ असं ते म्हणाले.
‘घडलेला प्रकार हा अतिशय क्लेशदायक व धक्कादायक असून त्यामधून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर नीट उपचार होतात का नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांमध्ये या सर्व व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली नाही तर वरिष्ठ पातळीवर याची तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times