पंजाबच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना लियाम लिविंगस्टोनच्या ८२ धावा आणि जितेश वर्माच्या ४९ धावांच्या जोरावर २१४ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. कॅमेरुन ग्रीननं आक्रमक खेळी केली पण त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ग्रीन २३ धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादवनं मुंबईच्या संघाच्या विजयाचा पाया रचला. इशान किशननं ७५ धावा केल्या तर सूर्यकुमार यादवनं ६६ धावा केल्या. दोघांनी मुंबईच्या संघासाठी १०० धावांची भागिदारी केली.
तिलक वर्मा टीम डेव्हिडनं विजयावर नाव कोरलं
तिलक वर्मा आणि डीम डेव्हिडनं इशान आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्मानं एक चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १० बॉलमध्ये २६ धावा केल्या. तर, टीम डेव्हिडनं १९ धावा करत २१५ धावांचं आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये पार केलं.
स्टंप मोडणाऱ्या अर्शदीप सिंहला मुंबईच्या फलंदाजांनी धुतलं
मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंह यानं दोन स्टंप मोडले होते. पंजाबच्या त्या विजयानंतर अर्शदीपची मोठी चर्चा झाली होती. कालच्या सामन्यात अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीची मुंबईच्या फलदाजांनी धुलाई केली. अर्शदीप सिंहनं ४ ओव्हरमध्ये ६६ धावा दिल्या.
अर्शदीपची धुलाई आणि मुंबई पोलिसांचं ट्विट
मुंबईच्या फलंदाजांची अर्शदीप सिंगची धुलाई केल्यानंतर मुंबई पोलिसांनी एक ट्विट केलं आहे. अर्शदीप सिंगनं दिलेल्या धावांचा उल्लेख करत मुंबई पोलिसांनी पंजाब किंग्जला आम्ही यशस्वीपणे गुन्हेगारांना पकडतो आणि शिक्षा देतो, असं ट्विट करत डिवचलं आहे.