मुंबई, ठाण्यातून नवी मुंबईकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता तुर्भे रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. सध्या पुलावर ये-जा करण्यासाठी प्रत्येकी तीन मार्ग उपलब्ध आहेत. रुंदीकरणात पुलाच्या दोन्ही दिशेला अतिरिक्त दोन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. यामुळे तुर्भे रेल्वे उड्डाणपुलावरून पुणे-गोव्याच्या दिशेने अधिक वेगाने प्रवास करता येणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाची लांबी १६०० मीटर आहे. मार्गिकांच्या स्लॅब आणि रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. पाचपैकी तीन जोडरस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. तयार मार्गिकांवर स्टीलच्या कमानी उभारण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरणाचे एकूण ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, सध्या अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. यासाठी १५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जुलैअखेर तुर्भे पुलाच्या नव्या मार्गिकांवरून वाहनचालकांना प्रवास करता येणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्टीलच्या कमानी, एलईडी दिवे
रात्रीच्या दृश्यमानतेसाठी पुलावर स्टीलच्या कमानी उभारण्यात आल्या असून, यावर एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. नव्या मार्गिकांमधील रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सध्याच्या पुलाच्या जागेचा अधिकाधिक वापर करून कमी भूंसपादनात मार्गिकांची उभारणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त आणि रस्ते व रेल्वे वाहतुकीचा त्रास कमी करण्यासाठी १०० रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी महारेलकडून करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाने पुलाच्या उभारणीसाठी महारेलसह सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.