सोलापूर : सोलापूर शहरातील तीन मित्रांना एकाच दुचाकीवरुन पुण्याला जाणं जीवावर बेतलं आहे. सोलापूर – पुणे महामार्गावर असलेल्या टेंभुर्णीजवळ गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन मित्र जागीच ठार झाले, तर तिसऱ्या मित्राचा सोलापुरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातानंतर शहरातील भवानी पेठ परिसरात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर देखील तिघांना श्रद्धांजली वाहिली जात असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

१५ वर्षानंतर शिक्षकाला पहिला पगार मिळाला, घरी पोहोचतानाच काळाने गाठलं, मुलासह प्रवास थांबला

तेजस सुरेश इंडी (वय २०, रा. मिलन अपार्टमेंट, भवानी पेठ), लिंगराज शिवानंद हाळके (वय २४, रा. भवानी पेठ) हे दोघे जागीच ठार झाले, तर तिसरा मित्र गणेश शरणप्पा शेरी याचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, तेजस इंडी हा पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो ट्रेनने जाणार होता, मात्र लिंगराज हाळके आणि गणेश शेरी यांनी दुचाकीवरून जाऊ असा निर्णय घेतला. हाच निर्णय चुकला आणि तिघांच्या जिवावर बेतला.

Raigad Road Accident : डुलकी लागली आणि घात झाला, आंब्याने भरलेला पिकअपची ट्रकला धडक; पत्नीला गमावलं
ट्रिपलसिटवर निघालेले पुण्याला

महामार्ग पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजस इंडी, लिंगराज हाळके आणि गणेश शेरी हे तिघे एकाच मोटार सायकल (एम. एच. १३/ डी. झेड. ९८२६) वरुन ट्रिपल सीट सोलापूरहून पुण्याला निघाले होते. गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या दरम्यान सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ अरण गावच्या हद्दीत वरवडे नाका येथे त्यांच्या दुचाकीला अनोळख वाहनाची धडक बसली. या अपघातात तेजस इंडी आणि लिंगराज हाळके या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा मित्र गणेश शेरी हा गंभीर जखमी झाला होता.

बहिणीला भेटून घराकडे निघाले, वाटेत आक्रित घडलं, क्षणात भावाचा संसार उद्ध्वस्त
अपघातानंतर प्रथमत: पेट्रोलिंग करणाऱ्या महामार्ग पोलिसांनी अपघातातील वाहन बाजूला करुन तिघांना तातडीने टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. तेजस इंडी आणि लिंगराज हाळके या दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिसरा मित्र गणेश शेरी यास जखमी अवस्थेत शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या अपघात प्रकरणी किरण सुभाष इंडी यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यातत फिर्याद दिली असून अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जोग हे करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here