अशातच आता राष्ट्रवादीच्या या पक्षांतर्गत भूकंपानंतर राज्याच्या राजकारणात देखील पुन्हा मोठा भूकंप होणार असल्याचे संकेत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी १० मे च्या आधी नक्की होतील आणि ११ मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की असल्याचा दावा असीम सरोदे यांनी केला आहे. असीम सरोदे यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा नवी समीकरणं पाहायला मिळणार असल्याचे आडाखे बांधले जात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला असल्याने राज्याच्या राजकारणात कधीही भूकंप होऊ शकतो, असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन मोठा हादरा दिलाय. ईडीसारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली पक्षातील अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण शरद पवार यांच्या राजीनाम्यामागे आहे काय? असा सवाल आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे. त्यामुळे सरोदे यांच्या या दाव्यांना महत्व प्राप्त झाले आहे.
भाजपच्या गोटात हालचाली वाढल्या
एकीकडे पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत बैठकांचे सत्र सुरु आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त ‘वज्रमूठ’ सभा देखील रद्द झाल्या आहेत. त्यातच आता भाजपच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित निकाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी केंद्रातील भाजप नेतृत्वाच्या सांगण्यावरून मुंबईमध्ये येऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे.
बंद दाराआड झालेल्या या बैठकीमध्ये बदलत्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने राज्यातील सध्याच्या सरकारमध्ये कोणती नवी समीकरणे जुळवता येतील, याविषयी कायद्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी आहे. त्यामुळे एकूणच सगळ्या घडामोडींचं टायमिंग पाहता राज्याचे राजकारण पुन्हा एका नव्या समीकरणांच्या आणि मोठ्या भूकंपाच्या उंबरठ्यावर आहे, असंच म्हणावं आहे.