पाटणा: बिहारच्या नालंदामध्ये एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. राजगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजगीर-गया मुख्य रस्त्यावर झू सफारीजवळ त्याचा अपघात झाला. कुंदन कुमार (३०) असं अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. कुंदननं रेल्वेमध्ये गुड्स गार्ड पदासाठी परीक्षा दिली होती. त्यात तो यशस्वी झाला. त्याला जॉयनिंग लेटर मिळणार होतं. कुंदनचं कुटुंब त्याचीच वाट पाहत होतं. मात्र त्यापूर्वी कुंदनच्या निधनाची बातमी येऊन धडकली.कुंदन काही कामानिमित्त राजगीरला गेला होता. तिथून परतत असताना झू सफारीच्या जवळ एका अज्ञात वाहनानं कुंदनच्या बाईकला धडक दिली. बाईक झाडाला जाऊन धडकली आणि कुंदनचा जागीच मृत्यू झाला. कुंदनच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला दिली. यानंतर त्याचे कुटुंबीय, नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहोचले. कुंदननं रेल्वेत गुड्स गार्डची परीक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्ण झाला. सरकारी नोकरी लागल्यानं कुटुंब आनंदात होतं. त्याचं जॉयनिंग लेटर लवकरच येणार होतं. कुटुंबाला लेटरची प्रतीक्षा होती. मात्र कुंदनच्या अकाली निधनानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या कुटुंबाच्या आक्रोशानं रुग्णालय परिसरातील अनेकांचे डोळे पाणावले. अज्ञात वाहनानं तरुणाच्या वाहनाला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती राजगीर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष मोहम्मद मुस्ताफ यांनी सांगितलं. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. अज्ञात वाहन चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here